पुण्यातील कोरोनाग्रस्त दांपत्य ठणठणीत बरे झाले, आज घरी परतणार

15429

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. चिंता वाढवणाऱ्या या परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ज्या दांपत्याला राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते ते दांपत्य आता पूर्णपणे बरे झाले आहे.

सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस ते बरे झाले आहेत ना याची खात्री करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ते बरे झाल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी संभाजीनगरातील एक महिला देखील पूर्णपणे बरी झाल्याचे वृत्त आहे.

Corona Virus मला गुढी पाडव्याला घरचं जेवण जेवायचंय!

 

पुण्यातील दांपत्याला 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं. गेले चार दिवस त्यांना औषधे देण्याचं थांबवलं होतं, त्यामागचं कारण हेच होतं की औषध न घेता त्यांना आजार उलटत नाही हे हे डॉक्टरांना पाहायचं होतं. त्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी या दोघांची स्बॅब टेस्ट करण्यात आली. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले ज्यातून दोघे जण पूर्णपणे बरे झाल्याचे कळालं. या दोघांना बुधवारी सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. यामुळे यंदाचा गुढी पाडवा हा या दांपत्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा ठरणार आहे. या दांपत्यासोबत त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. हे दांपत्य मुंबईहून पुण्याला भाड्याच्या गाडीने आले होते. ते ज्या गाडीतून आले होते त्याच्या चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. या चालकावर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण 15 कोरोनाग्रस्त हे आता पूर्णपणे बरे झाले असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला
राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. राज्यामधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे. यात मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक असून इथे 41 जणांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याखालोखाल पुणे (18) आणि पिपरी चिंचवडमध्ये (12) कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत या आजारामुळे राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या