देशात 152 रुग्ण; लष्करातही शिरकाव; एक जवान पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात 24 तासांत रुग्णांची संख्या 14 ने वाढली आहे. आतापर्यंत 152 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लष्करातही ‘कोरोना’ने शिरकाव केला असून, लेह-लडाखमध्ये एका जवानाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेजण मुंबई, दिल्ली आणि कर्नाटकातील रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या 45 झाली आहे.

  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी कार्यालये आठ दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला.
  • देशभरातील रेल्वेचे 60 टक्के बुकिंग रद्द झाले आहे. तब्बल 150 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.

वडिलांमुळे जवानाला संसर्ग

कोरोनाचा संसर्ग आता सीमेवर अहोरात रक्षण करणाऱया जवानांपर्यंत पोहचला आहे. लडाख स्काऊट रेजिमेंटच्या एका 34 वर्षीय जवानाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हा जवान लेहमधील राहणारा आहे. तो सुट्टीवर 25 फेब्रुवारीला घरी गेला होता. त्यादरम्यान त्याचे वडील इराणवरून आले. त्यांना संसर्ग झाला होता. त्यापासून जवानालाही कोरोनाची लागण झाली. मात्र, त्याच्या लक्षात आले नाही. 2 मार्चला तो डय़ुटीवर आला. जवानाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

सेन्सेक्स 29000 पर्यंत खाली

कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. मुंबई शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स 1709 अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 29 हजारांपर्यंत खाली कोसळला. निफ्टीचाही सेन्सेक्स 498 अंकांनी कोसळला. निफ्टी 8468 वर बंद झाला. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.

डोक्याला ताप; पंजाबमधून 167 संशयित पळाले

कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असतानाच पंजाबमधून 167 संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लुधियानामधून हे सर्वजण बेपत्ता झाले आहेत. हे संशयित रुग्ण इतर नागरिकांच्या संपर्कात आल्यास मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाने संशयित रुग्ण शोधण्यासाठी 77 पथके तयार केली असून पोलिसांकडूनही रुग्णांचा शोध सुरू आहे.

36 देशांमधील प्रवाशांना हिंदुस्थानात बंदी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 36 देशांमधील नागरिकांना हिंदुस्थानात येण्यास बंदी घातली आहे. इटली, जर्मनी, फ्रान्स, फिनलँड, ग्रीस, डेन्मार्क, ब्रिटन, नेदरलँड, स्वीझरलँड, तुर्की, पोर्तुगाल, फिलीपाईन्स, मलेशिया, अफगाणिस्तान आदी देशातील विमानांना हिंदुस्थानात पुढील आदेश मिळेपर्यंत येता येणार नाही.

दिल्लीत हॉस्पिटलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून संशयिताची आत्महत्या

दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका ‘कोरोना’ संशयित रुग्णाने आत्महत्या केली. विमानतळावर तपासणीनंतर कोरोनाचा संशय आला. त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचे सॅम्पल्स चाचणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच संशयिताने आत्महत्या केली.