तीन आठवड्यांत तीन हजार 772 सील इमारती वाढल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना प्रतिबंधित इमारतींचा आकडाही वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यांत सील केलेल्या इमारतींची संख्या तब्बल तीन हजार 772 नी वाढली आहे. यामुळे मुंबईत आता एकूण सील इमारतींची संख्या आता 10 हजार 65 वर पोहोचली आहे.

कोरोना रुग्ण आढळल्यास पालिकेच्या माध्यमातून संबंधित इमारतीचा मजला किंवा एकाच इमारतीत 10 रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. कोरोना रोखण्यासाठी संबंधित सील इमारतींमध्ये कंटेन्मेंट झोनच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यात येत असून गेल्या 34 दिवसांमध्ये मुंबईतील प्रतिबंधित इमारतींचा आकडा 86 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. 1 सप्टेंबरपासून आतापर्यंत तब्बल तीन हजार 772 इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण प्रतिबंधित इमारतींचा आकडा आता दहा हजारांवर पोहोचला आहे.

झोपडपट्ट्या-चाळींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र कमी

मुंबईत ऑगस्टअखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यामुळे पालिकेने कोरोना रोखण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. 1 सप्टेंबर रोजी 6293 इमारती सील होत्या, 14 सप्टेंबरपर्यंत एकूण 8637 इमारती सील झाल्या तर आता ही संख्या 10,065 वर पोहोचली आहे. मात्र एकीकडे सील इमारतींची संख्या वाढत असताना झोपडपट्ट्या-चाळींतील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे. मुंबईत 617 क्वंटेन्मेंट झोन आहेत.

अशी आहे सद्यस्थिती

  • मुंबईतील सील इमारतींमध्ये 42 हजार 772 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बाधित 617 कंटेन्मेंट झोनमध्ये 32 हजार 822 रुग्ण आढळून आले आहेत.
  • सर्वाधिक सील इमारती आर मध्य-बोरिवली – 1135, आर दक्षिण-कांदिवली 1010 इतक्या आहेत. तर सर्वाधिक कंटेन्मेंट झोन आर उत्तर-दहिसर 68, एस-भांडुप – 64 या विभागात आहेत.