नगरमध्ये प्रेमी युगुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना प्रतिनिधी । नगर

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अवंतिका रघुनाथ दळवी (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे तर मुकुंद शंकर भोजने (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. हे प्रेमीयुगल कडा येथील राहणारे आहे. त्यांचे प्रेमप्रकरण त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास चिचोंडी पाटील रोडवरील बंद पडलेले हॉटेल येथे आले होते. त्या हॉटेलमध्ये दोघांनी घरून आणलेल्या डब्यात जेवण केले. जेवण केल्यानंतर हॉटेलच्या छताला गळफास लावून घेतला. ही बाब परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळविल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा अत्यवस्थ आहे. त्याच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगर तालुक्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.