
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयाने बुधवारी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणात इक्बालची चौकशी करण्यासाठी ईडीने दाखल केलेल्या अर्जाची दखल घेत पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जे. देशपांडे यांनी हे वॉरंट जारी केले.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरासह मुंबईत विविध ठिकाणी मंगळवारी ईडीने छापे मारले होते. त्यानंतर बुधवारी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात धाव घेऊन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची चौकशी करण्याच्या मागणीचा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यावर न्यायाधीश एम. जे. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. इक्बाल कासकर ठाण्यातील कारागृहात आहे. तेव्हा, कासकरला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया ईडीने 18 फेब्रुवारीच्या आधी पूर्ण करावी, अशा सूचना न्यायालयाने ईडीला दिले.



























































