
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपली संपत्ती जाहीर केली आहे. गेल्या वर्षभरात नितीश कुमार यांच्या संपत्तीत जास्त बदल झालेला नाही, मात्र त्यांच्या सरकारमधील काही मंत्री त्यांच्याहून जास्त श्रीमंत आहेत. काही मंत्र्यांकडे तर तीन-तीन लक्झरी कार आहेत, मात्र दुसरीकडे नितीश कुमार यांच्याकडे स्वत:ची एकच कार आहे.
नितीश कुमार यांच्या सरकारने प्रत्येक वर्षाच्या अखेरीस सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आपली संपत्ती आणि कर्जाची माहिती देण्याची अनिवार्य केले आहे. त्यानुसार 2023च्या अखेरच्या दिवशी नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी बिहार सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटींची चल आणि अचल संपत्ती आहे. तसेच त्यांच्याकडे 22552 रुपये रोख आणि विविध बँक खात्यांमध्ये 49202 रुपये आहेत.
नितीश कुमार यांच्याकडे 11.32 लाखांची एक फोर्ड इकोस्पोर्ट कार, 1.28 लाखांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची अंगठी आहे. अन्य चल संपत्तीमध्ये 1.45 लाखांच्या 13 गायी आणि 10 वासरं, एक ट्रेडमिल, एक व्यायाम करण्याची सायकल आणि एक मायक्रोवेव्ह ओव्हनचा समावेश आहे. तर एकमेव अचल संपत्तीमध्ये नवी दिल्लीतील द्वारका येथ एक अपार्टमेंट असून याची 2004मधील किंमत 13.78 लाख होती, तर आताची किंमत 1.48 कोटी रुपये आहे.
तेजप्रताप यांच्याकडे 3.58 कोटींची संपत्ती
दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे एकूण 4.74 लाखांची संपत्ती आहे. यात 50 हजार रुपये रोख आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाखांची रोकड आहे. मात्र त्यांचे बंधु आणि बिहार सरकारमधील मंत्री तेजप्रताप यादव यांच्याकडे 3.58 कोटींची संपत्ती आहे.

























































