कोलकाता रोखणार राजस्थानची घोडदौड? स्मिथची ब्रिगेड सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज

सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव… दुसऱ्या लढतीत 224 धावांचा यशस्वी पाठलाग… दोन्ही लढतींत 200 धावांचा टप्पा पार… ही सक्सेसफुल स्टोरी स्टीवन स्मिथच्या राजस्थान रॉयल्सची. आता आयपीएलमधील दुबई येथे होणाऱया लढतीत राजस्थान रॉयल्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी दोन हात करील. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मागील लढतीत मिळवलेल्या विजयानंतर आत्मविश्वासाने मैदानात उतरील. बघूया आता राजस्थान रॉयल्स सलग तिसऱया विजयाला गवसणी घालतोय की कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा विजय रथ रोखतोय ते…

आर्चर अॅण्ड पंपनीवर जबाबदारी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चर हा वेगवान गोलंदाज सांभाळतोय. टॉम करण, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातीया या गोलंदाजांनी त्याला उत्तम साथ द्यायला हवी. मागील लढतीत लोकेश राहुल व मयांक अग्रवालच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची दैना उडाली होती. अर्थात शारजा क्रिकेट ग्राऊंड आकाराने लहान असल्यामुळे येथे सर्वच संघांतील गोलंदाजांना खडतर आव्हानाचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

नितीश, कार्तिक, रसेल यांना चुणूक दाखवावी लागेल

मागील लढतीत शुभमन गिल व ओएन मॉर्गन यांच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. पण आता फक्त या दोघांनाच नव्हे तर इतर फलंदाजांनाही चमक दाखवावी लागणार आहे. कर्णधार दिनेश कार्तिक, मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणा, आंद्रे रसेल यांना जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.

स्मिथ, सॅमसन, तेवतीया शानदार फॉर्ममध्ये

राजस्थान रॉयल्सचे फलंदाज शानदार फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार स्टीवन स्मिथ, यंदाच्या मोसमाने नावारूपाला येत असलेला संजू सॅमसन व किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत क्षणार्धात लढतीचा निकाल बदलणारा राहुल तेवतीया हे फलंदाज जबरदस्त कामगिरी करताहेत. जोस बटलर या फलंदाजालाही सूर गवसल्यास कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना या सर्वांना रोखणे अवघड जाईल. पहिल्या दोन्ही लढतींत 200 धावांचा टप्पा ओलांडणाऱया राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याची जबाबदारी पॅट कमिन्स, सुनील नारायण, पुलदीप यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती या गोलंदाजांवर असणार आहे.

  • आजची लढत – राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई, रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या