सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आयोजनासाठी एमसीएचा पुढाकार

बीसीसीआयकडून अद्याप स्थानिक क्रिकेटच्या वेळापत्रकाबाबत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आयोजनासाठी बीसीसीआयकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. एमसीए कार्यकारिणीतील नदीम मेमन यांनी मुंबईत सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नदीम मेमन यांच्याकडून मागणी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले की, मुंबई अव्वल दर्जाची सहा स्टेडियम्स उपलब्ध आहेत. येथे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफच्या आरोग्याची तसेच सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येईल. पंचतारांकित हॉटेल्सचीही येथे सुविधा आहे. शिवाय या वर्षी महिलांची वन डे स्पर्धाही मुंबईत खेळवण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळायला हवा.

स्थानिक क्रिकेट स्पर्धा व्हायला हव्यात – अशोक मल्होत्रा

हिंदुस्थानी क्रिकेटर्स असोसिएशनचे प्रमुख अशोक मल्होत्रा यांनीदेखील नदीम मेमन यांच्या मागणीला थम्स अप दाखवला आहे. अशोक मल्होत्रा यावेळी म्हणाले, देशातील असंख्य क्रिकेटपटूंचा उदरनिर्वाह स्थानिक क्रिकेटद्वारे होत असतो. देशातील कोणत्याही एका शहरात स्थानिक स्पर्धा खेळवल्या गेल्या पाहिजेत.

कडक नियमांची अंमलबजावणी

नदीम मेमन यांनी पुढे म्हटले की, या स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक संघातील खेळाडूंची मुंबईत आल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात येईल. तसेच स्पर्धा सुरू होण्याआधीही खेळाडूंना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागेल. हॉटेलमध्येच त्यांना राहावे लागेल. कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात येणार नाही. संघातील सर्वांसाठी एक विशेष बसची सेवा पुरवण्यात येईल. बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व काही पार पाडले जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या