ऑनलाईन पिझ्झा मागवणे पडले महागात, टीम इंडियाच्या युवा खेळाडूला 50 हजारांचा गंडा

टीम इंडियाचा युवा खेळाडू विक्रांत सिंह भदौरिया (Vikrant Singh Bhadoriya ) याला ऑनलाईन पिझ्झा मागवणे महागात पडले असून सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. कोरोना काळामध्ये मध्य प्रदेशच्या या खेळाडूने ऑनलाईन पिझ्झा मागवला आणि त्याच्या बँक खात्यातून 49 हजार 996 रुपये उडाले. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

विक्रांत भदौरिया हा ग्वालियरमध्ये शिंदे छावनीमध्ये राहतो. टीम इंडियासाठी अंडर-19 खेळलेल्या आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केलेल्या या खेळाडूने डॉमिनोजवरून पिझ्झा मागवला होता. इंटरनेटवर डॉमिनोज पिझ्झा सेंटरचा कस्टमर केअर नंबर शोधून त्याने त्यावर फोन करून पिझ्झा ऑर्डर केला होता.

15 एप्रिलला पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर पेमेंटसाठी एक लिंक आली. ही लिंक क्लिक केल्यावर एक अॅप त्याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले आणि क्षणात त्याच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने सायबर क्राईमकडे याची तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या