पुण्यात पोलिसांची एकाच दिवसात 25 ठिकाणी छापेमारी; लाखोंचा गुटखा जप्त, 25 विक्रेत्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील अवैध गुटखाविक्री करणार्‍यांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरवात केली असून एकाच दिवशी तब्बल 25 ठिकाणी छापेमारी केली. येथून लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून 25 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात सर्वत्र छूप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे.

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखुजन्य पदार्थामध्ये गुटखा विक्रीस बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्रात गुटखा विकता येत नाही. मात्र अनेक पान टपर्‍या, किराणा मालाची दुकाने येथे अवैध्यरित्या गुटख्याची विक्री करण्यात येते. तर काही ठिकाणी खुला किंवा दोन मिश्रणे एकत्र करुन माव्याच्या नावाखाली गुटखा विकला जातो. गुटख्याने मुखाचा कर्करोग व इतर विकार होत असल्याची जनजागृती शासन मोठ्या प्रमाणात करत आहे. तरीही गुटख्याची मागणी कमी होताना दिसत नाही. ग्राहक विक्रेत्यांकडून अवैध्य मार्गाने दाम दुप्पट रक्कम देऊन गुटखा खरेदी करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अवैध गुटखाविक्री विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ठिकाणी छापे टाकून 25 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पानटपरी, स्नॅक सेंटर आणि किराणा मालच्या दुकानांवर करण्यात आली.

फरासखाना भागात बुधवार पेठेतील केंजळे चौक, डेक्कन परिसरातील झेड ब्रीज, शिवाजीनगरमधील एल.आय. सी कार्यालयाजवळ, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाना पेठ, सहकारनगर भागातील पद्मावती, भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार, कात्रज – कोंढवा रस्ता, दत्तवाडीतील जनता वसाहत, वारजेतील स्पेन्सर चौक, उत्तमनगरमधील शिवणे, कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी, सिंहगड रस्ता परिसरातील नर्‍हे, चतुःश्रुंगी परिसरातील कुंभारवाडा, पाषाण, खराडी, वाघोली, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर आदी भागांत छापे टाकून 25 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणाहून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून एकूण मुद्देमाल हा लाखो रुपयांत आहे.

व्यावसायिकांची छुपी चैन

गुटखा, पानमसाला विक्री करणार्‍यांमध्ये छोट्या पानटपरी चालकांचा समावेश सर्वाधिक आहे. तर, काही ठिकाणी सुपरमार्केटमध्ये देखील गुटखा विकला जात असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पानटपर्‍यांमध्ये विकला जाणारा गुटखा हा व्यावसायिकांकडून पुरविला जातो. अशा व्यावसायिकांनी छुप्या पद्दतीने शहरभर त्यांचे जाळे विणले आहे. त्यामुळे ही चैन तोडण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.