वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ओडिसा, मद्रासवरून येणार मगरी;  पालिका खर्च करणार 20 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात पर्यटकांसाठी ओडिसा, मद्रासवरून मगरी, सुसरी आणल्या जाणार असून त्या अगदी जवळून न्याहाळता येणार आहेत. यासाठी पालिका उद्यानात अनोखी ‘व्ह्यूविंग गॅलरी’ बनवत आहे. यामध्ये पर्यटकांना काचेच्या तावदानांमधून अगदी जवळून मगरी, सुसरी पाहता येणार आहेत. या उपक्रमासाठी पालिका सुमारे 20 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय  हे केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून उद्यान व प्राणी संग्रहालयाचा कायापालट करण्यात येत आहे. या ठिकाणी वाघ, हरीण, तरस, अस्वल, हत्ती, अजगर आणि शेकडो प्रकारचे पक्षी, झाडे आहेत. तसेच पाच मगरी आणि दोन सुसरीदेखील आहेत. या मगरी पाहण्यासाठी पर्यटक खिळून राहतात. त्यामुळे आगामी काळात मगरी सुसरींची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी नंदनकाकन, ओडिसा आणि क्रोकोडाइल बँक मद्रासकडे पालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे.

अशी असणार व्ह्यूविंग गॅलरी

प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्यूविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात येणार आहे. यामध्ये जाऊन ‘अंटर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्यूविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहता येणार आहेत. मगरीसाठी 1500 स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी असणाऱया मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मासे, बफेलो बिफ, चिकन असे खाद्य देण्यात येत आहे.