बारसूत अघोषित कर्फ्यू; एकच जिद्द रिफायनरी रद्द, पोलिसांच्या जुलमाविरुद्ध उठाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणची राखरांगोळी करणारा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प पोलिसी दडपशाहीच्या बळावर दामटवण्यासाठी ‘ईडी’ सरकारकडून बारसूमध्ये अक्षरशः अघोषित कर्फ्यू लादण्यात आला आहे. आंदोलकांना अन्न-पाणी घेऊन जाणारे टँकरही पोलिसांकडून रोखण्यात येत असून गावकऱयांना स्वतःच्या बागांमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बारसूत कोणी पोहोचू नये यासाठी धारतळे आणि रानतळे या ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. तर प्रकल्पाच्या ठिकाणची सत्यस्थिती समोर आणणाऱया पत्रकार, प्रसारमाध्यमांनाही वार्तांकन, व्हिडीओ शूटिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी अजूनही हजारो आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे.

कोकणवासीयांच्या प्रचंड विरोधामुळे विनाशकारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प’ नाणारमधून हद्दपार करण्यात आला. मात्र हाच प्रदूषणकारी प्रकल्प आता आता बारसू, सोलगावमध्ये सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे, धोपेश्वर परिसरही विनाशकारी प्रकल्पाच्या जबडय़ात अडकणार आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बारसू प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी ‘ईडी’ सरकारकडून पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. मंगळवारी पोलिसांकडून महिला, आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करून ताब्यात घेतल्यानंतर आता प्रमुख आंदोलकांची धरपकड करण्यासाठी दिवसरात्र रहिवाशांच्या घरोघरी शोधाशोध केला जात आहे.

विषारी प्रकल्पाचे परिणाम पटवून देणार

बारसूत होणारा प्रकल्प ‘ग्रीन रिफायनरी’ असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र हा प्रकल्प किती विषारी आहे, हे प्रशासनाला पटवून देण्यासाठी आंदोलकांनीही तज्ञांची टीम तयार ठेवली आहे. गुरुवारी होणाऱया बैठकीत आपली बाजू प्रशासनासमोर मांडू अशी माहिती आंदोलक दीपक जोशी यांनी दिली.

सर्व्हे न थांबवल्यास ‘आर या पार’

प्रशासनाकडून केवळ मातीपरीक्षण सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीचा सर्वे सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कलेक्टर आणि तहसीलदारांकडून आयोजित करण्यात आलेली पहिलीच बैठकही कोणत्याही निर्णयाशिवाय फिस्कटली आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी जमिनीचा सर्वे थांबवावा, अन्यथा शुक्रवारी ‘आर या पार’ची लढाई आंदोलनाच्या माध्यमातून सुरू होईल, असा इशारा आंदोलकांच्या वतीने बारसू रिफायनरीविरोधी संघटनेचे कोकण अध्यक्ष अमोल गोळे यांनी दिला आहे.

आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव

आंदोलक कुटुंब कबिल्यासह प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे दीड हजार रहिवासी ठाण मांडून असताना रखरखत्या उन्हात आणि रात्रीदेखील प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. अन्न-पाणी घेऊन येणाऱया गाडय़ा अडवल्या जातात. त्यामुळे उष्माघात पिंवा एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांकडून प्रचंड दबाव आणला जात आहे. आंदोलनातील महत्त्वाच्या लोकांना तडीपारीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

– संपूर्ण पंचक्रोशीत याआधीच ‘जमावबंदी’ लागू करण्यात आली असून शस्त्र्ाधारी पोलिसांचा खडा पहारा 24 तास ठेवला जात असून दिवसरात्र पोलीस व्हॅन फिरवून दहशत पसरवली जात आहे.
– बारसूत होणाऱया आंदोलनाला बारसू, सोलगाव पंचक्रोशीसह संपूर्ण कोकणातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय झाला नाही तर संपूर्ण कोकणामधील जनतेच्या साथीने व्यापक जनआंदोलन होईल, असा इशाराही रिफायनरीविरोधी संघटनेने दिला आहे.

आंदोलकांचा संताप

– आम्ही दहशतवादी नाही, शेतकरी आहोत!
– रिफायनरी हटवा, कोकण वाचवा!
-जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची
– ट्विटरवर ‘से टू नो रिफायनरी’ हॅशटॅग मोहीम

अजूनही हजारो आंदोलकांचा ठिय्या

प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू झालेले आंदोलन आज सलग तिसऱया दिवशीही सुरू राहिले. विशेष म्हणजे आंदोलकांनी रणरणत्या उन्हासह रात्रीही प्रकल्पाच्या ठिकाणी ठिय्या मांडत आंदोलन सुरू ठेवले. अंगावर गाडय़ा घाला, गोळ्या घाला, जोपर्यंत प्रकल्प रद्द केल्याची घोषणा होत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.