
सामना प्रतिनिधी । पुणे
एका तरुणीला कंगवा आवडल्याने तिने त्याची ऑनलाईन ऑर्डर केली. प्रत्यक्षात हा कंगवा आल्यानंतर तो तिला पसंत पडला नाही, त्यामुळे तिने हा कंगवा परत केला. यानंतर तिने पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला असता तिचे बँकेचे डिटेल्स घेऊन 29 हजार रुपयांचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
ही तरूणी पुण्यात एमबीएचे शिक्षण घेत आहे. तिने ऑनलाईन कंगवा बघितला. 175 रूपये भरून तो कंगवा तिने मागवला, परंतू, तो प्रत्यक्षात वेगळाच निघाल्याने तिने तो परत केला. त्याबदल्यात तिला पैसे दिले पण 86 रूपये कमी होते. उर्वरीत पैसे मिळावेत यासाठी तिने प्रयत्न केला. ही तरूणी गाढ झोपेत असताना पहाटे सहाच्या सुमारास एकाने तिला फोन करून तुमचे पैसे परत करायचे आहेत, तुमच्या बँकेचे नाव व एटीएम कार्डचे शेवटचे चार क्रमांक पाठवा असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच तिच्या खात्यावरून 29 हजार रूपये काढून घेण्यात आले. यामध्ये फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.


























































