दादर स्थानकातील फलाट क्रमांक 9 डिसेंबरपासून बदलणार; ‘मरे’च्या फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकच असल्याने नवख्या प्रवाशांचा मोठा गोंधळ उडतो. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही मार्गावरील फलाट क्रमांक सलग करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणी 9 डिसेंबरपासून केली जाणार आहे. त्याची पूर्व तयारी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. तसेच मध्य रेल्वेच्या सध्याच्या फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई उपनगरीय मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी दादर स्थानकाची ओळख आहे. मात्र येथे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील फलाट क्रमांक सारखेच असल्याने प्रवाशांचा कायम गोंधळ उडतो. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकात आता सलग 1 ते 15 फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून सुरू झालेला क्रम मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत वाढत जाणारा आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे एक ते आठ क्रमांकाचे फलाट इतिहासजमा होतील. त्याऐवजी ते आता आठ ते 14 क्रमांकांनी ओळखले जातील.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन एकमेकांना लागून होते. सीएसएमटी, परळहून सुटणाऱया लोकल दादर स्थानकात फलाट क्रमांक एकवरून जातात, तर दोनवरून 11 गाडय़ा सुटत होत्या. त्यामुळे सात मीटर रुंदी असलेल्या या फलाटावर नेहमी प्रवाशांची गर्दीच असायची. त्याची दखल घेत रेल्वेने सदर फलाटाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले होते. हे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक 2 कायमस्वरूपी रद्द होणार आहे.