दैनिक ‘सामना’ दिवाळी अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार, 27 फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे 49 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. दैनिक ‘सामना’च्या दिवाळी अंकाला गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक पुरस्कार जाहीर झाला आहे. अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी शनिवारी या पुरस्कारांची घोषणा केली.

पारितोषिक वितरण समारंभ 27 फेब्रुवारी रोजी असलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन अर्थात मराठी भाषादिनी दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्ट, मराठी विचारधारा प्रतिष्ठान आणि पार्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथालय चळवळीसाठी योगदान दिलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे (नाशिक) यांना ‘स्व. दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.