
टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता हिंदुस्थान आणि द. आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेचे द्वंद्व रंगणार आहे. या मालिकेनंतर आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डीन एल्गरने निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्याने अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.
हिंदुस्थान आणि आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे, मात्र या मालिकेमध्ये एल्गर कसोटी क्रिकेट खेळताना शेवटचा दिसणार आहे. त्याने आपल्या आपल्या क्रिकेटमधून निवृत्त होताना शतक ठोकण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ‘म्हणतात ना, चांगल्या गोष्टींचा शेवट असतो आणि हिंदुस्थानविरुद्धची कसोटी मालिका ही माझी शेवटची मालिका असेल. मी या सुंदर खेळातून निवृत्त होत आहे. क्रिकेटने मला भरभरून दिले आहे. केपटाऊन कसोटी हा माझा शेवटचा सामना असेल. शेवटच्या सामन्यातदेखील मी शतकी खेळी करू शकेन. अशा शब्दांत एल्गरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
























































