अत्यंत चिंताजनक, हे तातडीने थांबवले पाहिजे; आखाती क्षेत्रात जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांचा हिंदुस्थानकडून तीव्र निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने अलीकडेच आखाती क्षेत्रात हिंदुस्थानी खलाशी असलेल्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांना अत्यंत चिंताजनक म्हटले असून, हे हल्ले तातडीने थांबवले पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. दैनिक जागरणने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन लष्कराच्या हल्ल्याला बळी पडलेल्या एका जहाजावरील तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला ते बेपत्ता असल्याची बातमी होती, मात्र नंतर त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, “अलीकडच्या काळात पश्चिम आशियामध्ये हिंदुस्थानी खलाशांशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही आमच्या खलाशी समुदायाच्या कल्याणाला आणि सुरक्षेला खूप महत्त्व देतो. ही बाब पुन्हा सांगण्याची गरज नाही.”

जयस्वाल म्हणाले, “काल आम्ही ओमानच्या किनाऱ्याजवळ एका जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला, ज्यामध्ये दुर्दैवाने आमच्या तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या सीडीएला बोलावले होते. या प्रदेशात जहाजांवर वारंवार होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा हा थेट परिणाम आहे. हे हल्ले थांबले पाहिजेत आणि संघर्ष संपुष्टात आला पाहिजे.”