
अयोध्येतील राम मंदिरात देणगी घोटाळा झाल्याच्या आरोपामुळे वातावरण ढवळून निघाले असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी आज खळबळजनक वक्तव्य केले. ‘देणगी घोटाळ्यात खूपच शक्तिशाली आणि मोठे लोक सहभागी आहेत. मी बोललो तर अडचणीत सापडेन,’ असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे घोटाळ्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले.
राम मंदिराच्या देणगीतील सात कोटी चोरीला गेल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला होता. ‘हा विषय धार्मिक श्रद्धेचा व कोटय़वधी सनातनींच्या भावनांशी संबंधित असल्याने न्यायालयाने स्वतःहून याची दखल घ्यावी, अशी मागणी अखिलेश यांनी केली होती. त्यांच्या या आरोपांनंतर देशभर चर्चेला उधाण आले. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत विश्वस्तांची बैठक घेतली. त्यामुळे केंद्र सरकारकडून चौकशीची घोषणा होऊ शकते, असे बोलले जात होते.
सत्य सांगण्याचे धाडस माझ्यात नाही!
आज बृजभूषण सिंह यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले. ‘या घोटाळ्यात बडय़ा लोकांचा हात आहे. पण माझ्यात आता सत्य सांगण्याचे धाडस नाही. मी 2023 पासून कुस्तीपटूंच्या आरोपांमुळे सुरू झालेल्या वादाचा सामना करतोय. त्यामुळे राम मंदिराच्या घोटाळ्यावर आता काहीच बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन,’ असे बृजभूषण म्हणाले.




























































