
सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकूहल्ला करणाऱया दोन आरोपींना कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक करून गंभीर गुह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
फिर्यादी सतीश कुमार बोलामनी पाठक (26) हे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस ते खोपोली लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. लोकलने वांगणी रेल्वे स्थानक पार केल्यानंतर सीटवर बसण्याच्या कारणावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी पाठक यांच्या पोटात चाकूने वार करत मारहाण व शिवीगाळ केली.या घटनेनंतर कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड व गुन्हे तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. उल्हासनगर, शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकांसह नेरळ शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी इब्रान इद्रिस अन्सारी (18) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (22) यांना नेरळमधील ममदापूर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली.
या गुह्यातील आणखी एक आरोपी सिद्धार्थ गायकवाड हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त (लोहमार्ग) राकेश एम. कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कामगिरीत पीएसआय कुरुंद, पोलीस उपनिरीक्षक पी. एन. कड, पोलीस हवालदार कांबळे, शेख, चव्हाण तसेच मोहिते, चोरमळे, जाधव, मुलमुले आणि पेरणेकर यांनी सहभाग घेतला. कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत गंभीर गुह्यात आरोपींना गजाआड केले


























































