ओमानमध्ये 3 हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू, मोदींना ‘महान’ आणि ‘माझे मित्र’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या अमेरिकेचा दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानी जहाजावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अभिनंदन केले. ‘माझे मित्र’ आणि ‘महान’ असा त्यांचा उल्लेख केला. या कौतुक सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने ओमानच्या समुद्रात हिंदुस्थानी जहाजावर हल्ला चढवला. तर बुधवारच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला आहे. मागच्या चार दिवसांत हिंदुस्थानी जहाजांवर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.

आखातात युद्ध पेटल्यापासून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद केली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणची नाकेबंदी केली आहे. इराणच्या बंदरांवर तेल व गॅस भरण्यासाठी जाणाऱ्या जहाजांवर हल्ले केले जात आहेत. कायमस्वरूपी युद्धबंदीची शक्यता मावळल्याने मागच्या काही दिवसांत अमेरिकेने पुन्हा जहाजांना लक्ष्य केले आहे. हिंदुस्थानशी संबंधित तिसऱया जहाजावर आज हल्ला झाला.

हल्लाच का, जप्ती का नाही?

आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार, प्रत्येक जहाजाला आपल्या प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱयांची नावे आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती प्रत्येक बंदरावर सादर करावी लागते. त्यामुळे हल्ला झालेल्या जहाजांवर हिंदुस्थानी नागरिक असल्याची माहिती अमेरिकेला नव्हते असे होऊच शकत नाही, असे खलाशी संघटना ‘एफएसयूआय’चे सरचिटणीस मनोज यादव म्हणाले. ‘अमेरिकी नौदलाला सर्व काही माहीत होते. माहीत नव्हते असे गृहीत धरले तरी थेट क्षेपणास्त्र हल्ला करण्याऐवजी जहाज जप्त करता आले असते. मात्र त्यांनी थेट हल्ला केला. हा निष्पाप खलाशांचा जीव घेण्याचा प्रकार आहे,’ असे मनोज यादव म्हणाले.

इंजिन रूमवर डागली क्षेपणास्त्रे

इराणच्या दिशेने जाणाऱया हिंदुस्थानच्या ‘एमटी जलवीर’ या जहाजाला अमेरिकेने लक्ष्य केले. अमेरिकी नौदलाने ‘जलवीर’च्या इंजिन रूमवर दोन क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे जहाज पेटले. जहाजावरील सर्व खलाशी सुखरूप असून ओमानी नौदलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात येत आहे.

चार दिवसांत तीन जहाजे लक्ष्य

सोमवारी अमेरिकेने ‘मारीवेक्स’ या जहाजावर हल्ला केला होता. त्यानंतर बुधवारी ‘सेटबेलो’ जहाजावर हल्ला झाला. त्यात 24 हिंदुस्थानी होते. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानी परराष्ट्र खात्याने अमेरिकेच्या राजदूतांना समन्स बजावले होते. त्यानंतरही अमेरिकेने आज पुन्हा हल्ला केला.

सरकार म्हणते, हल्ले चिंताजनक

अमेरिकेच्या हल्ल्यावर हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र संताप व्यक्त केला. ‘हिंदुस्थानी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. हे हल्ले तत्काळ थांबले पाहिजेत. आमच्या भूमिकेची अमेरिकेने गांभीर्याने नोंद घ्यावी,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. ‘अमेरिका व इराणने चर्चा आणि वाटाघाटींवर भर द्यावा,’ असेही त्यांनी सांगितले.