
निवडणुकीतील पराभव, पक्षातील उभी फूट आणि जवळच्यांनी साथ सोडल्यामुळे राजकीय संकटात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आज सर्वात मोठा धक्का बसला. गेली अनेक वर्षे ममतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले, न्यायालयात व मीडियात पक्षाची बाजू ठामपणे मांडणारे निष्ठावंत खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही बंडाचे संकेत दिले. ‘पुतण्या अभिषेक बॅनर्जी की माझ्यासारखा ज्येष्ठ कार्यकर्ता? यापैकी एकाचीच निवड दीदींना करावी लागेल,’ असा अल्टिमेटमच त्यांनी दिला.
कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी मानले जातात. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक आमदार-खासदार पक्ष सोडत असताना कल्याण बॅनर्जी हे ममतांसोबत राहिले आहेत. ममतांची पाठराखण करत त्यांनी फुटीरांवर तोफाही डागल्या. अभिषेक यांच्या विरोधातील बनावट सह्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात तेच बाजू मांडत होते, मात्र आज अचानक त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला. अभिषेक बॅनर्जी यांनी विश्वासात न घेता खटल्यातून बाजूला केल्याने ते संतापले. त्यांनी अभिषेक यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘मी आजही ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहे, मात्र त्यांनी अभिषेक आणि माझ्यातून एकाची निवड करावी. अभिषेक यांच्याशिवाय पक्ष चालणार नाही असे त्यांना वाटत असेल तर मी पक्षात राहणार नाही,’ असे कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.
अभिषेक यांना धक्काबुक्की
बनावट सही प्रकरणात सीआयडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी कोलकात्यात आलेले खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कोलकाता विमानतळावर धक्काबुक्की करण्यात आली. विमानतळावरून बाहेर पडताना काही लोकांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या.
कठीण काळात ममतांची साथ सोडणार नाही – शत्रुघ्न सिन्हा
चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या ममतांना आज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलासा दिला. ’कठीण काळात ममता दीदींनीच साथ सोडणार नाही,’ असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. ’तृणमूलमधून फुटलेल्या 19 खासदारांमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे देखील असल्याची चर्चा होती. ही चर्चा त्यांनी फेटाळून लावली. ’2019 मध्ये पाटण्यातील निवडणूक हरल्यानंतर मी कठीण काळातून जात होतो, तेव्हा केवळ ममता दीदींनी मला आधार दिला. मला तिकीट दिले आणि मला निवडून आणले. मी अडचणीत असताना त्यांनी मला साथ दिली. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची साथ देणे हे माझे कर्तव्य आहे. मी तृणमूलच्या तिकिटावर निवडून आलो आहे आणि तिथेच राहणार आहे,’ असे सिन्हा म्हणाले.
अभिषेकने पक्ष उद्ध्वस्त केला!
कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाच्या पराभवासाठी अभिषेक यांनाच जबाबदार धरले. ‘अभिषेक हे अत्यंत उद्धट आहेत. त्यांचा अहंकारी स्वभाव मला अजिबात आवडत नाही. त्यांनी आमचा पक्ष उद्ध्वस्त केला. आज पक्ष ज्या संकटाचा सामना करतोय त्याला कारण फक्त आणि फक्त अभिषेक बॅनर्जी आहेत,’ असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. ‘राजकारणातही मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. मी अपमान सहन करू शकत नाही. दीदींना अभिषेकवर अवलंबून राहायचे असेल तर माझी हरकत नाही. मी बाजूला होईल. त्यांनी अभिषेकला दूर केले तर मी त्यांच्यासोबत असेन,’ असे त्यांनी स्पष्ट केले.




























































