फ्लिपकार्टवरून मागवलं अ‍ॅसिड, बोलणं बंद केल्याच्या रागातून हल्ला केल्याची आरोपीची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे आरोपींना कठोर शिक्षा देण्याची चर्चा होत असताना दुसरीकडे अ‍ॅसिड विक्रीवर बंदी आहे, मग ते विकत कसे घेता आले? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दिल्लीतील द्वारका मोरजवळ बुधवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी 17 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले.

पीडित मुलगी बुधवारी बहिणीसोबत शाळेत जात होती. अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मुलीचा चेहरा जवळपास 8 टक्के भाजला असून तिच्या डोळ्यांनाही इजा झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीवर फेकण्यासाठी आरोपीने ऑनलाइन अ‍ॅसिड विकत घेतले होते. तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी सचिन अरोरा याने ऑनलाइन साईट फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड मागवले होते. यासाठी सचिनने ऑनलाइन पेमेंट केले होते. पोलिसांनी सांगितले की, सचिन आणि पीडित तरुणी हे मित्र होते आणि एकाच परिसरात राहत होते. तरुणीने 2-3 महिन्यांपूर्वी मैत्री तोडली आणि त्याच्याशी बोलणे बंद केले. बोलण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मित्रांसोबत अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला.

अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून मुख्य आरोपी सचिनने आणखी एक युक्ती खेळली. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने त्याच्या मित्राला स्वतःचे कपडे घालून दुचाकीवर पाठवले. त्याचे लोकेशन इतरत्र कळावे म्हणून त्याने आपला मोबाईलही त्याला दिला. मात्र, काही तासांतच पोलिसांनी त्याला पकडले.

दरम्यान दिल्लीचे एलजी व्ही.के. सक्सेना यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे मागवला आहे. दिल्लीत अ‍ॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची खरेदी कशी झाली असा सवाल उपराज्यपालांनी केला आहे. दुसरीकडे, DCW अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी अ‍ॅसिड हल्ल्याबाबत सांगितले की, बंदी असतानाही भाजीपाल्याप्रमाणे अ‍ॅसिड खरेदीसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅसिड विक्रीवरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आयोग कोर्टात जाऊ शकतो.