कश्मीरमध्ये 90 च्या दशकासारखी परिस्थिती; केंद्राने कश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यावी – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये आता कश्मिरी पंडित परतत आहेत. मात्र, या परतणाऱ्या कश्मिरी पंडितांना दहशतवादी लक्ष्य करत आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडितांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे केंद्राने कश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. जम्मू कश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांची दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्या होत आहे. या घटना रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. तसेच याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यात येतो, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

राहुल भट, एमएल बिंदू आणि रजनी बाला हे सर्व कश्मिरी समाजाचा भाग होते. या वर्षात 16 कश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे कश्मिरात 90 दशक परत येत आहे, असा इशाही केजरीवाल यांनी दिला. कश्मीरमधील नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम , शांततेने राहण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, दहशतवादी त्यांना शांततेत जगू देत नाहीत. हिंदूमुस्लीम ऐक्य त्यांच्यासाठी धोका आहे. या घटना रोखण्यासाठी कश्मिरी पंडितांना केंद्राने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केजरीवाल यांनी दिली.

कश्मीर हे कश्मिरी पंडितांची जन्मभूमी आहे. ते कश्मिरात जाणारच. मात्र, सध्याच्या घटनांमुळे कश्मिरी पंडित जम्मू, श्रीनगरमध्ये स्थलांतर करत आहे. कश्मिरी पंडितांसोबत असे दुसऱ्यांदा होत आहेत. कश्मिरी पंडितांचे येथे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात यावे, केंद्र सरकारने त्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी जे सहकार्य लागेल, ते करण्यास तयार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.