दिल्ली महापौर निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारीला बैठक, तिसर्‍यांदा गदारोळानंतर नायब राज्यपालांकडून बैठकीस मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आपने बहुमतांचा आकडा पार केला. मात्र केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत भाजपने दिल्ली महापौर निवडणूक होऊ नये, यासाठी तीनवेळा गदारोळ घातला. यानंतर दिल्लीतील महापौर निवडणुकीची 16 फेब्रुवारी नवी तारीख मिळाली आहे. यासाठी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी मान्यता दिली आहे. दिल्ली सरकारने सभागृहाचे अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी रविवारी स्वीकारला.

यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील महापौरपदाची निवडणूक तिसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली. 10 नामनिर्देशित सदस्य मतदानासाठी मंजूर झाल्यानंतर भाजप आणि आपच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यानंतर एमसीडी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 6 आणि 24 जानेवारीलाही निवडणुका होऊ शकल्या नाहीत. 6 जानेवारी रोजी एमसीडीच्या मुख्यालयात आप आणि भाजपच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर २४ जानेवारीला मुख्यालयात पोलीस तैनात करावे लागले. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली.

आपच्या शेली ओबेरॉय महापौरपदाच्या उमेदवार

बहुमत असलेल्या आपने शेली ओबेरॉय यांना तर भाजपने रेखा गुप्ता यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत राजधानीला महिला महापौर मिळणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी महापौर भाजपचाच असेल असा दावा केला. एमसीडी निवडणुकीनंतर सभागृहाची पहिली बैठक 6 जानेवारीला झाली, मात्र गदारोळामुळे महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. आपने मोहम्मद इक्बाल आणि भाजपने कमल बागडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे.