
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असून, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. मात्र, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना भेटणे बंद केले आहे. त्यांच्या या ‘नाराजी’नाम्यामुळे काँग्रेस नेते गोंधळून गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी 25 मे रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वर्किंग कमिटीने राजीनामा फेटाळला तरी राहुल गांधी त्यावर ठाम आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुत्रप्रेमामुळे राहुल गांधी नाराज आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राहुल गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या ‘तुघलक लेन’ निवासस्थानी गेले होते. मात्र, राहुल गांधींनी त्यांना भेटणे नाकारले. अखेर या नेत्यांनी प्रियंका गांधी-वढेरा यांची भेट घेतली. आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी-वढेरा वगळता इतर कोणत्याही नेत्यांना राहुल गांधी भेटले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ठराव येणार
राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी रहावे. राजीनामा देवू नये असा ठराव बुधवारी राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विविध राज्यांच्या प्रदेश कमिटींमध्ये असा ठराव होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
























































