
पत्नीच्या मृत्यूनंतर मागील एका महिन्यापासून नैराश्यात असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारच्या सुमारास हडपसरमधील हरपळे वस्तीवर घडली. राजेश महाजन (वय 50) असे आत्महत्या केलेल्या एएसआयचे नाव आहे. ते मोटार परिवहन विभागात कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करातून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांपुर्वी महाजन पुणे पोलिस दलात नियुक्त झाले होते. गेल्या महिन्यात त्यांचे पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे महाजन नैराश्याच्या गर्तेत गेले होते. त्यामुळे मोटार परिवहन विभागात असतानाही ते काही दिवसांपुर्वी कोणाशीही बोलत नव्हते. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.























































