राज्यातल्या विकासकामांसाठी वितरित केलेल्या निधीला स्थगिती

949
mantralaya-5

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत यांना विकासकामांसाठी वितरित केलेल्या निधीला स्थगिती देण्याचा  निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने आज रात्री उशिरा घेतला. ज्या विकासकामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिले आहेत अशा कामांना मात्र स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे ही कामे सुरूच राहतील.  मात्र कार्यारंभ आदेश दिलेल्या सर्व कामांची यादी उद्या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नगरविकास विभागाला सादर करावी लागणार आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना विकासकामांसाठी विविध योजनांअंतर्गत विशेष अनुदान देण्यात येते, पण 2019-2020 या वर्षासाठी नगरविकास विभागामार्फत विविध कामांसाठी वितरित केलेल्या निधीला स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास विभागाने तातडीने जारी केले आहेत.

पुढील आदेशांपर्यत स्थगिती

नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी हे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना वरील योजनांपैकी ज्या योजनांमध्ये सरकारने वितरित केलेल्या निधीपैकी ज्या कामाच्या कार्यारंभाचे आदेश देण्यात आलेले नाहीत अशा सर्व कामांचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे तर नगरोत्थान प्रकल्पाचे कार्यारंभाचे आदेश आलेले नाहीत अशा कोणत्याही प्रकल्पांचे काम सुरू करण्याचे आदेश देऊ नयेत अशा सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या