
श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केली.
सरकारची संथ कारवाई
श्रद्धा वालकरच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी लक्षवेधी सुचना मांडण्यात आली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार सुनील प्रभू म्हणाले की, ही सामजिक घटना आहे. आतापर्यंत महिला, मुलींवर परिचितांकडून अत्याचार होत आहेत.सरकारने यामध्ये समाज प्रबोधनासाठी काय केले. महिलांवरील खटले जलदगतीने झाले पाहिजेत. शक्ती कायदा कधी येणार? अशा या नराधमांना शिक्षा करण्यासाठी कठोर कायदा करणे गरजेचे आहे. पण सरकार संथ गतीने सर्व कार्यवाही करीत आहे.
श्रध्दा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती?
श्रध्दा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भाईंदर पोलिस ठाण्यात एका मुलीच्या भावाने तक्रार नोंदवली आहे. भाईंदर पोलिस त्या मुलीशी संपर्क साधत आहेत. पण नातेवाईक म्हणतात या मुलीच्या बँक खात्यातून पैसे काढले आहेत. ती आमच्याशी बोलत नाही. काही गैरप्रकार होऊ शकतो. आम्हाला काळजी वाटते. त्यामुळे त्या मुलीला आमच्या समोर आणा अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. भविष्यात या मुलीबाबत श्रध्दा वालकरची पुनरावृत्ती झाली तर गृहखाते जबाबदार असेल असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला.

































































