
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचाराच्या काळातील कटूता बाजूला ठेवून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी नवा आदर्श समोर ठेवला आहे. हातकणंगले मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांचा पराभव केल्यानंतर त्यांच्याच घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतला.
खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वादही घेतले. यावेळी राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांचे औक्षण केले. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे सर्वकाही चांगलं होईल, असे धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले.
‘माझा आशीर्वाद लय मोठा आहे’, असं त्या यावेळी म्हणाल्या. तसेच ‘माझा लेक सर्वांना धरून आहे, तसं तुम्हीही लोकांना धरून राहा’, असंही त्या म्हणाल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात जोरदार लढत झाली. राजू शेट्टी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात होते. धैर्यशील माने यांनी 93 हजार मतांनी विजय मिळवला. राजू शेट्टी यांना पराभूत केल्याने 2019 च्या जायंट किलर खासदारांपैकी एक अशी ओळख धैर्यशील माने यांना मिळाली. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांनी राजकारण बाजूला ठेवत नवा आदर्श उभा केला.

























































