धारावी प्रकल्प रद्द, शेतकऱयांना पेन्शन; वंचितचा समान किमान कार्यक्रम, महाविकास आघाडीला मसुदा सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीमध्ये समान किमान कार्यक्रम असावा असा वंचित बहुजन आघाडीचा आग्रह आहे. त्यासाठी वंचितने आघाडीला मसुदा सादर केला असून त्यात 39 मुद्दय़ांचा अंतर्भाव आहे. अदानी समूहाला दिलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने रद्द करावा, शेतकऱयांना पेन्शन द्यावी, राज्यात अडीच लाखांची नोकरभरती करावी, भूमिहीनांना गायरान जमिनी, तृतीयपंथीयांना आरक्षण द्यावे अशा वंचितच्या विविध मागण्या आहेत.

‘वंचित बहुजन आघाडी’ने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी समान किमान कार्यक्रम असावा आणि त्यावर मतैक्य झाल्यानंतरच जागावाटपावर चर्चा केली जावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यानुसार वंचितच्या उपाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हा मसुदा दिला आहे. महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत हा मसुदा ठेवण्यात येणार आहे. धार्मिक, अल्पसंख्याकांसाठी ‘ऍट्रॉसिटी’ कायदा लागू करावा, शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतकऱयांकडून कोणी माल खरेदी केली तर काय करावे? यावर निर्णय घ्यावा, कृषी उपकरणांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, कापूस एकाधिकारशाही योजना पुन्हा लागू करावी, खत अनुदानात वाढ करावी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप, असंघटित कामगारांसाठीचा घरकुल प्रश्न सोडवावा, महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करावे, आरोग्यावर 10 टक्के खर्च आणि आयुष्मान भारत योजनेत ‘बायोमेट्रिक’चा अंतर्भाव करावा, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 550 चौरस फुटांची घरे दिली जावीत आदी मागण्यांचा या मसुद्यात समावेश आहे.