ईव्हीएम यंत्रांचा ‘निकाल’ केव्हा लागणार?

>>दिलीप जोशी<<

khagoldilip@gmail.com

आतापर्यंत मतदान यंत्रांनी अनेकदा बिघाडाची घंटा वाजवली आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड मनस्तापही झाला आहे. पुढील मतदान वर्षात हा मनस्ताप नागरिक, निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी यांना मनापासून नको आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मतपत्रिकेचा म्हणजेच मतदानाच्या जुन्या पद्धतीचाच उपयोग झाला पाहिजे. दोष यंत्रांचा आहे असे एकच तुणतुणे आवर्जून वाजवले जाते, पण यंत्रे बिघडतात हे माहीत असूनही नेहमी त्याच पर्यायाचा उपयोग करणे हा सरकारचा दोष नव्हे का? या ईव्हीएम यंत्रांचा निकालकेव्हा लागणार आहे?

ईव्हीएम यंत्र मतदान प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. संपूर्ण प्रक्रियाच या यंत्राद्वारे चालत असल्याने ते तांत्रिकदृष्टय़ा अचूकच असायला हवे. किंबहुना तशी व्यवस्था करणे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांचे दायित्व असते. हे दायित्व कसे पार पाडले जाते याकडे नागरिकांचे लक्ष असते. नागरिकांना गृहीत धरून वाटचाल करता येत नाही. कारण या यंत्राचा उपयोग हा त्यांनाच करायचा असतो. त्यामुळे त्याची ‘तांत्रिक सक्षमता’ शंकाकुशंकांना वाट करून देणारी नसावी हा अगदी सामान्य विचार आहे. मतदान यंत्राची तांत्रिक सक्षमता चोख ठेवण्यात वारंवार अपयश येत आहे हे लपून राहिलेले नाही. तेव्हा किती काळ यंत्रातील दोषाकडे बोट दाखवणार? एक बोट यंत्रातील दोषाकडे दाखवताना उरलेली बोटे संबंधित दोष सुधारण्यासाठी अद्याप निर्णायक प्रयत्न का केले नाहीत? असा प्रश्न विचारतात. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये पाच वर्षांसाठी कारभार सोपवायचा असतो, तो सोपवण्यासाठी मतदार राजाची भूमिका जेवढी निर्णायक असते तेवढीच त्या यंत्राचीही सक्षमता अत्यंत महत्त्वाची असते. या गंभीर विषयाला सहजपणे घेतले जाऊ नये.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्र बंद पडल्यावर मतदारांचा वेळ वाया जातो. पालघर, गोंदिया पोटनिवडणुकीत यंत्रे बंद पडलेल्या ठिकाणी वेळ वाढवून दिली गेली, पण यंत्रे बंद पडल्यामुळे मतदान केंद्रांवरून परतलेले मतदार पुन्हा आले का, याचा मागोवा घेतला गेला आहे का? वेळ वाढवून दिली म्हणजे केवळ कर्तव्याचे सोपस्कार पार पडल्यासारखे करणे म्हणावे लागेल. वेळ वाढवून देण्याचे आम्ही आमचे काम केले आहे. त्या वेळी तुम्ही (मतदार) आला नाहीत त्याला आम्ही काय करायचे? अशा पठडीतील हा प्रकार वाटतो. कोणत्याही गोष्टीचा तोंडी प्रचार (माऊथ पब्लिसिटी) हा अत्यंत जलदपणे होत असतो. तसेच बोलणाऱ्याचे तोंड कोण बंद करणार हेही सूत्र आहेच. हे लक्षात घेता मतदानाच्या वेळी मतदान यंत्रांत बिघाड झाल्याची वार्ता क्षणार्धात पसरण्यास अवधी लागत नाही. वृत्तवाहिन्यांवर तत्काळ याच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ येऊ लागतात. अवधी लागतो तो झालेला बिघाड दुरुस्त करून ते यंत्र पुन्हा चालू करण्यास. याचा अनुभव अर्धा ते दोन तास मतदान यंत्रे या निवडणुकीत जिथे बंद राहिली त्या ठिकाणी मतदानास गेलेल्या नागरिकांनी घेतला असेलच. त्यामुळे कित्येक मतदारांनी मतदानास जाणेच रहित केले असेल. अशा गोष्टींचा परिणाम अर्थातच मतदानाच्या टक्केवारीवर होतो. मतदान यंत्रांतील दोष का सुधारण्यात आलेले नाहीत? हिंदुस्थान तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे.  अशावेळी मतदान यंत्रांत नेहमीच बिघाड होणे आणि त्यामुळे मतदारांच्या उत्साहावर पाणी फिरणे हे रडगाणे नेहमीचेच झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग का शोधण्यात आलेला नाही? असा संतप्त प्रश्न मतदार राजाच्या मनामध्ये उचंबळत आहे. महत्त्वाचे सूत्र असे की, दोष यंत्रांचा आहे असे एकच तुणतुणे आवर्जून वाजवले जाते, पण यंत्रे बिघडतात हे माहीत असूनही नेहमी त्याच पर्यायाचा उपयोग करणे हा सरकारचा दोष नव्हे का?

पाच वर्षांचा सरकारच्या कालावधीचा विचार करता पुढील वर्ष हे राज्यासाठी विधानसभा, तर देशासाठी लोकसभा निवडणुकांचे वर्ष आहे. १३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशासाठी वर्ष २०१९ हे राजकीय पटलावर विशेष असणार आहे. असे सांगण्याचे कारण हेच की, आतापर्यंत मतदान यंत्रांनी अनेकदा बिघाडाची घंटा वाजवली आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड मनस्तापही झाला आहे. पुढील मतदान वर्षात हा मनस्ताप नागरिक, निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी यांना मनापासून नको आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मतपत्रिकेचा म्हणजेच मतदानाच्या जुन्या पद्धतीचाच उपयोग झाला पाहिजे. मतदान यंत्रांतील बिघाडांमुळे फेरमतदान घ्यावे लागणे हे फारच खर्चिक आहे हे का लक्षात घेतले जात नाही? तांत्रिक अडचणीमुळे जनतेला पुन्हा मतदान केंद्रावर जावे लागणे हे संतापजनक नव्हे का? ‘मतदान यंत्र हवे की नको’ यावरच मतदान घ्यायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण जी गोष्ट कधीही बंद पडू शकते त्यावर कसे अवलंबून राहिले जाऊ शकते? अशी गोष्ट निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन उभे राहणार की काय अशी शक्यता वाटत आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यावर मतदान यंत्र हा विषय दुर्लक्षित होतो. निकाल लागला ना! अशा विचारानेच निकालाकडे पाहिले जाते.

सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून मतदान यंत्रे हद्दपार करण्याची तयारी असल्याचे सत्ताधारी पक्षाने मार्च महिन्यात सांगितले. याविषयी सर्व पक्षांचे एकमत होण्यास अडचण नसावी. याविषयी त्वरित निर्णय होऊन संवेदनशील बनलेल्या या सूत्रावर मतपत्रिकाच्या वापराच्या माध्यमातून तोडगा काढून होत असलेले वाद थांबवणे अनिवार्य आहे. यंत्रामुळे वादंग सुरू झाल्यावर तातडीने मतपत्रिकेच्या वापराकडे वळणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही आणि आजही त्याचाच उपयोग चालू आहे. ज्या गोष्टीविषयी अनेक तक्रारी आहेत त्याचा पुनः पुन्हा उपयोग होत राहणे योग्य नाही. त्यामुळे नागरिकांतही संभ्रम निर्माण होतो आणि शंकाकुशंकांना उधाण येते. मतपत्रिका वापरामुळे मतमोजणीचे काम वाढणार असले तरी यंत्रातील त्रुटींमुळे जो सावळागोंधळ उडतो तो उडणार नाही हे महत्त्वाचे नाही का? मतदारांना मतदानासाठी कटकट न करणारी व्यवस्था पुरवणे विद्यमान सरकार आणि निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. ते त्यांनी जबाबदारीने पार पाडून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.

मतदान यंत्रावर उष्ण वातावरणाचा परिणाम झाल्याने त्यात बिघाड झाल्याची कारणे सांगितली गेली. देशातील वातावरण कसे असते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यंत्रांची निर्मिती करताना देशातील तापमानात न अडखळता चालणारी यंत्रे का सिद्ध केली नाहीत? असा मुख्य प्रश्न निर्माण होतो. कागदावर तापमानाचा परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही आणि यंत्राविषयी जी तांत्रिक कारणे सांगितली जातात तो मुद्दाही डोके वर काढण्याची शक्यता राहत नाही. यंत्राच्या बिघाडाचे कवित्व ऐकून उबग आला आहे.

एक प्रतिक्रिया

  1. आजच्या ह्या अंकातच दहशतवादी हल्ल्यात २६७ टक्के वाढ झाली अशी मानवी जीवांबद्दल आपण टक्केवारीची गोष्ट करता,पण मग एखाद्या मतदार संघात एकंदर किती मतदान यंत्रे लागली त्यातली किती यंत्रे सदोष निघाली त्याची टक्केवारी पाहिल्यास असेच दिसेल की हे प्रमाण ओरडा करण्याएवढे मोठे नाही.एखाद्या छापखान्यात पुस्तकाच्या हजारो प्रती छापल्या जातात त्यातील काही प्रती शाई कमीजास्त झाली तर ह्याचा अर्थ सारीच पुस्तके सदोष असा होत नाही.