दिलीप कुमार, राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घराचे होणार जतन! पाकिस्तान सरकार करणार घरांची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीमधील महान कलाकार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या पाकिस्तानातील पेशावरमधील वडिलोपार्जित घरांची खरेदी करण्याचा निर्णय खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने घेतला आहे. ही दोन्ही घरे जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून त्याचे जतन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ही घरे जमीनदोस्त करून त्या जागेवर सध्याचे मालक व्यावसायिक इमारत बांधणार असल्याची गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती.

राज कपूर आणि दिलीप कुमार या अभिनेत्यांचा जन्म पाकिस्तानातील आहे. दोन्ही अभिनेत्यांचे वडिलोपार्जित घर पेशावर येथे आहे. कपूर हवेली किस्सा ख्वानी बाजार परिसरात असून ही हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवान बशेश्वरनाथ यांनी 1918 ते 1922 सालादरम्यान बांधली गेली होती. या घराची मालकी सध्या अली कादर यांच्याकडे आहे. याच भागात ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे 100 वर्षे जूने वडीलोपार्जित घर आहे. 2014 साली तत्कालीन नवाज शरीफ सरकारने या वास्तूला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले होते.

या दोन्ही इमारतींचे संवर्धन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्व विभागाने घेतल्याचे या विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी सांगितले. या संदर्भात पेशावरच्या उपायुक्तांना लेखी आदेशही देण्यात आले आहेत.

कपूर हवेलीला पाडण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केला नाही. या हवेलीचे जतन व्हावे यासाठी आम्ही पुरातत्व विभागाशी संपर्क साधला असून त्याचे मूल्य साधारण 200 कोटी रूपये असल्याचे कपूर हवेलीचे मालक अली कादर यांनी सांगितले आहे. पेशावरमध्ये सध्या 300 वर्षे जून्या तब्बल 1800 ऐतिहासिक इमारती आहेत