
राकेश कुलकर्णी । धाराशिव
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठीसाठी शेगावहून मजल -दरमजल करीत निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडीचे शुक्रवारी धाराशिव शहरात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. दिंडीचे शहरात आगमन होताच धाराशिवचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी धाराशिवकरांच्या वतीने दिंडीचे स्वागत केले.
काल गुरुवारी तालुक्यातील उपळा येथे मुक्कामी असणाऱ्या दिंडींचे सकाळी धाराशिव शहरात आगमन झाले. या दिंडीचे स्वागतासाठी धाराशिवकरांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. श्रीच्या पालखीचे शहरात आगमन होताच तेरणा कॉलेज येथे धाराशिवचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पालखीचे स्वागत करुन मनोभावे पुजन केले.
त्यानंतर शहरातील दुध संघ, ज्ञानेश्वर मंदिर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोर, पोलिस मुख्यालय, कोर्ट, शिवाजी चौक आदी ठिकाणी भाविकांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, अॅड. मिलींद पाटील यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना चहा, पाणी, फराळ आदीचे वाटप करण्यात आले. तसेच आज रात्री ही दिंडी धाराशिव मुक्कामी राहणार असून शहरातील लेडीज क्लब येथे पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सकाळी ही पालखी वडगाव (सि.) कडे प्रस्थान करणार असून वडगाव येथील भोजन आटोपून दिंडी तुळजापूरकडे निघणार आहे.
गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे हे ५१ वे वर्ष असून ही दिंडी दिंनांक १९ जून रोजी शेगावहून पायी निघाली आहे. पालखी सोहळ्यासोबत ६५० वारकरी ३ अश्व व ९ वहाने आहेत. यामध्येही संस्थानच्या पिण्याच्या पाण्याचा टँकरसह रुग्णवाहिकेचा समावेश आहे. गजानन महाराजांची पालखी सोहळा शेगाव ते पंढरपूर असा ८ जिल्हातून ३३ दिवसात ७५० कि.मी.अंतर पार करीत २१ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार असून त्याठिकाणी चतुर्दशी पर्यत मुक्कामी रहाणार असून पौर्णिमेचा काला घेऊन पालखी परत शेगावकडे निघणार आहे.






























































