
महाविद्यालयातील भौतिक विभागात कार्यरत असलेल्या संचालकाला 60व्या वर्षी निवृत्ती हवी आहे. त्यासाठी या संचालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संचालक पदाला शिक्षकाचाच दर्जा दिलेला आहे. शिक्षकाला निवृत्तीचा जो लाभ दिला जातो तसाच लाभ मलाही द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
जावेद बाबासाहेब मानेर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. कोल्हापूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील भौतिक विभागाचे ते संचालक आहेत. महाविद्यालयाने त्यांना निवृत्तीचे पत्र दिले आहे. या पत्राविरोधात त्यांनी अॅड. सुरेश पाकळे यांच्यामार्फत याचिका केली आहे. न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
























































