
>> आसावरी जोशी
९० चे दशक.. चौकोनी कॅसेट्सचा जमाना.. मुंबईचे ह्रिदम हाउस.. समस्त संगीतप्रेमींची पंढरी.. दुर्मिळ संगीताच्या ध्वनीमुद्रिका.. ध्वनिफिती.. मिळण्याचे एकमेव ठिकाण.. परवाच पहिले तर ही संगीतपंढरी आता बंद पडली आहे.. कारण आता कॅसेट्स.. सीडीज विकल्या जात नाहीत.. पर्यायाने निघतही नाहीत.. आताचे संगीत हे समाजमाध्यमांवरून ब्लू टूथच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हायरल होते.. त्यासाठी कोणत्याही दुकानाची गरज पडत नाही.. अगदी नव्याने प्रदर्शित झालेले संगीत एका क्षणात व्हायरल होते.. आणि निमिषार्धात त्याला लाखो लाईक्स मिळतात.. याच्याचवरून समजते.. तुमचे संगीत लोकांना किती आवडते.. पण ९० चे दशक हे एवढे त्वरित आणि सोपे नव्हते..उत्तम संगीतापर्यंत आपल्याला पोहोचावे लागत होते.. त्याचा शोध घ्यावा लागत होता.. ते सुवर्णकणाप्रमाणे टिपावे लागत होते.. यासाठीची संगीतपंढरी होती ह्रिदम हाउस. अशाच एका संध्याकाळी सुवर्णकण टिपण्यासाठी मी ह्रिदम हाउसमध्ये प्रवेश केला.. आणि काही क्षणांत तेथे सुरु असलेल्या स्वरांच्या वर्षावात मी स्तब्ध झाले.. राग अहिर भैरव! वेळ संध्याकाळची.. प्रत्येक स्वर.. आणि सूर.. बावनकशी सोन्यागत सच्चा..संध्याकाळच्या पश्चिमेत लालस केशरी होत मनाचा ठाव घेणारा.. धीरगंभीर खर्ज.. अंतर्मुख करणारा.. सुराच्या प्रत्येक लकबीसोबत मनाची हुरहूर वाढत होती..स्वर कोणाचा हे समजत नव्हते.. पण प्रात: समयी गायला जाणारा हा अहिर भैरव संध्येची आर्तता मात्र वाढवत होता..गाणारा आवाज जरी अपरिचित असला तरी सुस्वरांतून प्रकटणारा आत्मविश्वास मनांस आणि कानांस मोहवत होता.. जराही विलंब न करता त्या स्वर्गीय स्वरांचा मी शोध घेतला..

ऊ. राशीद खान. सर्वस्वी अपरिचित नाव.. पण स्वर मात्र संगीताप्रती सच्ची निष्ठा दाखविणारा..त्यावेळी माहितीच्या स्रोतांना खूपच मर्यादा असल्याने उस्ताद्जींविषयी माहिती कमी पण पण त्यांच्या बहुतेक शास्त्रीय चीजा आणि बंदिशींचे संग्रह करण्यात मात्र मी यशस्वी ठरले. त्यांच्याविषयीची माहिती काढण्याच्या नादात पं. भीमसेन जोशींचे उस्ताद्जींविषयीचे अत्यंत ठाशीव विधान माझ्या वाचनात आले. पंडितजी म्हणाले होते, हा नवयुवक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे भविष्य ठरेल. खरोखरच पंडितजींची ही भविष्यवाणी उस्ताद्जीनी तंतोतंत खरी ठरविली. अनेक मैफिली.. ध्वनिफिती.. आणि आता अनेक वर्षांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याचा योग आला.. मनमोकळ्या स्वभावाचे उस्तादजी लगेच बोलायला तयार झाले.. उत्तर प्रदेशातील बदायु.. एक छोटेसे गाव.. घरातच गाणे.. घरी.. आजोळी गाण्याशिवाय दुसरे काहीच नाही.. गुलाम मुस्तफा खान उस्तादजींचे काका.. पण छोट्या राशिद्चे गाण्यातील गुरु त्यांचे मामा.. निसार हुसेन खान. रामपूर सहास्वन घराणे गाण्याचे.. याचे बाळकडू उस्तादजीनी नकळत्या वयात घेऊन वयाच्या ११ व्या वर्षीच आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केली.. घराण्याविषयी बोलताना उस्तादजी म्हणाले.. पं. भीमसेन जोशी नेहमीच असे म्हणायचे की कोणताही चांगला कलावंत हा एक चांगला चोर असावा लागतो.. आणि मी पंडितजींना अतिशय मानतो.. कारण गाणे हे इतके विशाल आणि अनंत आहे की ही घराणी फक्त त्या गाण्याला एक शिस्त राहावी म्हणून तयार करण्यात आली आहेत.. प्रत्येक घराणे हे गाणेच आहे.. आणि गाणे हे ईश्वराचे देणे आहे..

रियाझ हा उस्तादजींच्या गाण्याचा भक्कम पाया आहे.. उस्तादजी सांगतात, त्यांचे गुरुजी निसार हुसेन खान अत्यंत कठोर आणि शिस्तप्रिय होते.. गाणे म्हणजे काय हेही समजत नसताना छोट्या राशिदला निसार हुसेन खान पहाटे चार वाजता स्वर साधनेला बसवायचे.. आणि तासनतास एक नोट घेण्याचा सराव करून घ्यायचे.. संपूर्ण दिवस फक्त एक नोट सराव करण्यात जायचा. राशिदला या साऱ्या सरावाचा अत्यंत तिटकारा होता.. पण त्याच्या हातात काहीच नव्हते. या कठोर प्रशिक्षणामुळे ग्वाल्हेर घराण्याच्या सह्स्वान शैलीवर उस्तादजीचीच हुकुमत चालते. तराणा आणि ख्याल गायकी ही उस्तादजींची खास वैशिष्ट्ये. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कला सादर केली. येथे उस्ताद्जीनी एक किस्सा सांगितला.. कार्यक्रम सुरु होण्याआधी त्यांना थोडी सुस्ती आली होती. ही गोष्ट त्यांच्या गुरूंच्या लक्षात येताच ते राशीदवर अत्यंत चिडले.. आणि एक सणसणीत लाथ त्याला घातली. आणि हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.. वयाच्या १४व्या वर्षी उस्ताद्जीना शिष्यवृत्ती मिळाली. अजूनही आपल्या गुरूंच्या धाकाने उस्तादजी रियाझाला बसतात. खरे म्हणजे राशिदला क्रिकेटपटू व्हायचे होते.. पण घरातील गाण्यापासून ते लांब राहू शकले नाहीत. अस्सल तराणा आणि ख्याल गायकीसोबत उस्तादजी हिंदी चित्रपट, सुगम संगीत यातही रस घेतात. त्यांच्या दृष्टीने कोणतेही संगीत हे गुणवत्तेत कमी नसते. ते सादर कसे केले जाते यावर सारे अवलंबून असते. त्यामुळे अनेक चित्रपटातील त्यांची गाणी चीत्रपटाहून अधिक गाजली आहेत. जब वी मेट, मौसम अशा काही मोजक्या हिंदी चित्रपटांसाठी आपला आवाज देऊन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. संगीतावर विविध प्रयोग करायला उस्तादजीना नेहमीच आवडते. पण शास्त्रीय संगीतातील शिस्तीचा विनाकारण बडगाही त्यांना आवडत नाही.. ठुमरी गायिका गिरीजा देवीना ते विशेष मानतात. आपाजींकडून त्यांच्या हातचा चुडा मटार खाता खाता कानावर ठुमरीचे संस्कारही करून घेतले. उस्तादजी स्वत: उत्तम खवय्ये आहेत, कबाब, बिर्याणी स्वत: करून इतरांना खिलवायला त्यांना विशेष आवडते.
मुंबई महाराष्ट्राविषयी उस्तादजीना विशेष ममत्व आहे. त्यांच्या गुरुजींना उत्तम मराठी यायचे.. उस्तादजीनाही मराठी चांगले समजते, बऱ्यापैकी बोलताही येते. आपले अभंग गायला त्यांना विशेष आवडते.. महाराष्ट्रात येऊन केवळ अभंग गाण्याचा कार्यक्रम ते करणार आहेत.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताविषयी ते अत्यंत आश्वस्थ आहेत. ते सांगतात. आपल्या संगीताचे भविष्य अत्यंत उज्वल आहे. कारण नव्या पिढीला हे संगीत शिकण्यात रस आहे. त्यांना स्वत:ला लहान मुलांना शिकवायला विशेष आवडते. त्यांच्यावर आपल्या अकादमीतून ते विशेष मेहनत घेतात. लहान मुलांसोबत स्वत: रियाझाला बसतात. त्यांना सरावाचे महत्व समजावतात.. इदीसोबत उस्तादजींच्या घरी आणि त्यांच्या संगीत अकादमीत गणेशोत्सव, नवरात्र सारख्याच उत्साहात साजरे केले जातात. येथे गाण्यानेच, संगीताने प्रत्येक दिव्यत्वाची आराधना केली जाते..
मुलाखत संपली होती.. अहिर भैरवचे सूर पुन्हा कानात गुंजत होते.. भीमण्णांचा आभाळभर आशीर्वाद सार्थ ठरवत उस्ताद्जींचा स्वरसुरांचा पारिजात कोलकात्यात बहरला असला तरी त्याची फुले मात्र साऱ्या पृथ्वीच्या अंगणात पडत असतात.. आणि हा प्राजक्त दरवळ आपली दिवाळी सुगंधी करणार याची मला मनोमन खात्री होती..
| ReplyForward |

























































