थंडीतले आजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ

शरीराला बळ देणारा ऋतू म्हणून हिवाळ्याची ओळख आहे. हाच हिवाळा गुलाबी आणि बोचरी थंडी घेऊन येतो. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे शरीराला कोरडेपणा येतो. हा कोरडेपणा त्वचेवर तर येतो, पण आपण योग्य काळजी घेतली नाही तर नाक, कान, घसा हे कोरडे पडतात. त्यामुळे नाक चोंदणे, वारंवार शिंका येणे, कान गच्च होणे, कानाचे दडे बसणे, घसा खवखवणे, त्याचप्रमाणे निसर्गात जसे धुके बर्फ जमा होते, त्या पद्धतीने शरीरात कफ जमा होतो. मग आता प्रश्न पडतो या सगळ्यांसाठी काय उपाय करायचे.

सर्वप्रथम आपण हे होऊच नये म्हणून काय करावे ते पाहू. दररोज आंघोळीपूर्वी 20 मिनिटे मानेपासून पायाच्या नखापर्यंत तेल लावून हलक्या हाताने मालिश करावे व तेल जिरवावे. चहामध्ये आलं, गवती चहा, दालचिनी, तुळशीची पानं, सुंठ, लवंग यांचा वापर करावा. कानामध्ये, नाकामध्ये रोज 2-2 थेंब तिळाचे तेल सोडावेत. शक्य होईल तेव्हा गरम पाणी प्यावे. दोन चमचे तिळाचे तेल आणि एक ग्लास गरम पाणी मिक्स करून सकाळच्या गुळण्या करणे. या सगळय़ांमुळे कोरडा खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी, श्वास (दमा) यांसारखे आजार होणार नाहीत आणि झालेच तर औषधी उपाय काय करावे ते पाहूया…

  • नाक चोंदणे आणि त्यामुळे डोके जड होणे असे होत असल्यास (सुंठ+हळद+वेखंड (कमी प्रमाणात) + पुनर्नवा + आंबेहळद यांचा कपाळ, नाक, गाल यांवर लेप करणे. यावेळी त्वचा नाजूक असेल तर दुधात उगाळून लेप करणे आणि त्वचा सहनशील असेल तर पाण्यात उगाळून लेप करणे. सुकल्यावर कोमट पाण्याने पुसून घेणे.
  • घसा खवखवत असेल तर हळद, मीठ पाण्यात मिसळून गुळण्या करणे. आलं व गूळ एकत्र करून चघळणे. खदिरादी वटी, व्योषादी वटी, ज्येष्ठाrमध घनवटी या गोळय़ा चघळून खावे.
  • छाती गच्च झाली असेल तर तिळाच्या तेलामध्ये पाव चमचा सैंधव मीठ/ जाड मीठ मिक्स करून गरम करणे आणि छातीला मागे पुढे हलक्या हाताने जिरवणे व गरम पिशवीने शेक घेणे. त्यामुळे कफ मोकळा होऊन बाहेर पडतो आणि आराम मिळतो. जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ‘श्वासकुठार’, ‘सितोपलादी चूर्ण’, ‘श्वास कास चिंतामणी’ ही औषधे आल्याचा रस आणि मधासह घेणे.
  • थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आलं + दोन कप पाणी उकळवून एक कप करणे. गाळून त्यात एक चमचा मध + एक चिमूट हिंग मिक्स करून सकाळ-संध्याकाळ घेणे. या काढ्याने वरील सर्व तक्रारी बऱ्या होतात.
  • सांधे दुखत असतील तर तिळाचे तेल, सहचर तेल, महाविषगर्भतेल, नारायणी तेल लावून जिरवणे आणि गरम पाण्याने शेक घेणे.