
>> डॉ. राजकुमार यल्लावाड
साहित्याचा संसार भावनेवर आधारित असतो. शब्द त्याचे माध्यम असतात. ते माध्यम आशयाला प्रभावीपणाने पुढे घेऊन जात असतील तर निश्चितच ते साहित्य ‘सौंदर्य’मूल्याने विणलेले असते. प्रभावी शब्दाविष्काराने बहरलेली ‘शब्दवेली’ रसिकांना मोहित करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेले ‘शब्दवेली’ पुस्तकही वाचनीय आहे. ‘शब्दवेली’तील विविध वेचे, वैविध्यपूर्ण कविता व मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत केलेली आखीव-रेखीव संरचना आणि बांधणी हे घटक कारणीभूत आहेत.
पुस्तकात जुन्या व नवीन लेखक-कवींच्या रचनांचा सुंदर समन्वय साधलेला आहे. श्रममूल्य, लोकशाही मूल्य, वैज्ञानिक जाणिवा यांसह अन्य जाणिवांचा समावेश आहे. ‘विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीबरोबरच त्यांची साहित्य अभिरुची संपन्न होईल; तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, राष्ट्रभानाची चेतना जागृत होऊन तो प्रागतिक दृष्टी अंगीकारेल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल आणि मूल्यात्मकदृष्टय़ा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहरेल या दृष्टिकोनातून ही ‘शब्दवेली’ देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे मराठी मंडळाचे संपादक डॉ. सर्जेराव जिगे यांनी म्हटले आहे. या जीवनाला सौंदर्यरूप प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्यात्मकता असणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तक मूल्यात्मक कसोटीवर श्रेष्ठ दर्जाचे आहे.
शब्दवेली
संपादक : मराठी भाषा मंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
प्रकाशक : आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे : 136 , किंमत : 150/- रुपये





























































