तिसरी लाट धास्ती आणि वस्तुस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. राकेश मिश्रा

संसर्गग्रस्त लोकांचे व्यवस्थित आयसोलेशन करण्यात आले, तर नवा म्युटंट धोकादायक असूनसुद्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आयसोलेट केलेल्या लोकांपुरताच त्याचा ‘अवतार’ मर्यादित राहील. अशा प्रकारे आपणच विषाणूवर हल्ला करणे आवश्यक असते. उत्परिवर्तन हे विषाणूचे सर्वांत मोठे शस्त्र आहे आणि तेच विकसित होऊ न देता आपल्याला त्याच्या क्षमतेचा मुकाबला करावा लागेल.

कोविड-19ची तिसरी लाट हिंदुस्थानात लवकरच धडकण्याची शक्यता असून याबाबत देशात विविध अंदाज बांधण्यात येत आहेत. तिसरी लाट खरोखर येईल का? आलीच तर दुसऱया लाटेप्रमाणे ती हिंदुस्थानला जोरदार धक्का देईल का?असे अनेक प्रश्न आहेत. हिंदुस्थानात सुमारे 10 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे; परंतु सिरोप्रिव्हेलन्स सर्वेक्षणानुसार 68 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. तिसरी लाट आलीच तरी ती सौम्य असेल असे अपेक्षित आहे; परंतु ज्या 30 टक्के लोकसंख्येमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी तयार झालेली नाही आणि लसीकरणही झालेले नाही, ती संख्याही खूप मोठी आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कारण संसर्ग अजूनही अस्तित्वात आहे, ही लाट स्थानिक स्वरूपाची असण्याचीही शक्यता आहे.

मोठय़ा संख्येने लोकांना लसीचे एक किंवा दोन डोस देण्यात आले आहेत आणि विशेषतः मोठय़ा शहरांमध्ये लक्षणीय संख्येने लोकांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी दिसून आली आहे. या दोन प्रमुख आधारांवर तिसरी लाट सौम्य करण्यास मदत होणार आहे. मोठय़ा शहरांमध्ये संसर्गाच्या लाटा अधिक नुकसान करतात. त्यामुळेच अशा शहरांमध्ये तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता आहे. सिरोपॉझिटिव्हिटी ही लसीकरणाइतकी प्रभावी नसली, तरी संसर्ग बऱयापैकी दूर ठेवण्यास त्यामुळे मदत होते. तिसरी लाट किती मोठी असेल हे तीन घटकांवर अवलंबून असणार आहे. आपण कोविड नियमावलीचे व्यवस्थित पालन करणार की नाही हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरेल. म्हणजेच आपण सातत्याने मास्क वापरला पाहिजे आणि गर्दीचे सोहळे टाळले पाहिजेत.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण मोठय़ा संख्येने चाचण्या सुरू ठेवल्या पाहिजेत आणि जे संसर्गग्रस्त आढळतील त्यांना शोधून लगेच वेगळे (आयसोलेट) केले पाहिजे. विषाणूचा प्रसार रोखण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरतो. तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे लसीकरण. आपण जर दररोज सुमारे एक कोटी लोकांचे लसीकरण करू शकलो तर आगामी काही महिन्यांत विषाणूचा प्रसार प्रभावीपणे रोखू शकू. जर आपण या तीन गोष्टींचे प्रभावीपणे पालन केले आणि लोकांनी सहकार्य केले तर कदाचित आपल्याला तिसरी लाट येऊन गेलेलीही कळणार नाही, परंतु दोन गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. एक म्हणजे सिरोपॉझिटिव्हिटी किती काळ टिकते हे आपल्याला ठाऊक नाही. पहिल्या लाटेत संसर्गग्रस्त झालेल्या लोकांपैकी किती जणांच्या शरीरात अँटिबॉडीज अद्याप टिकून आहेत हे आपल्याला माहीत नाही. जो दुसरा घटक आपल्या हातात नाही, तो आहे विषाणूचे उत्परिवर्तन. वस्तुतः काही प्रमाणात ते आपल्या हातात आहे असेही म्हणता येईल. असे म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा विषाणू लोकांना संसर्गग्रस्त करतो तेव्हाच विषाणूच्या संख्येचा आपल्या शरीरात गुणाकार होत जातो. लक्षणे दिसून येत नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले लोक जर मोठय़ा संख्येने असतील तरीही ते विषाणूचे वाहक आहेतच आणि विषाणूला नवीन रूपे तयार करण्यासाठीही (उत्परिवर्तन) ते मदत करत आहेत असे म्हणावे लागेल. यातील काही व्हेरिएन्ट जर डेल्टापेक्षा धोकादायक असतील तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

तूर्तास तरी डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा अधिक धोकादायक व्हेरिएन्ट पाहायला मिळालेला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएन्टही फार मोठय़ा संख्येने अस्तित्वात नाही. डेल्टाचा प्रसार मात्र मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. सध्याच्या संसर्गग्रस्तांपैकी 90 टक्के लोकांमध्ये हा व्हेरिएन्ट दिसतो आहे. डेल्टा व्हेरिएन्ट हा अतिजलद संसर्ग पसरविणारा असला तरी आता आपल्याला तो नियंत्रित करता येत आहे ही चांगली बाब आहे. वस्तुतः डेल्टापेक्षा भयावह प्रतिरूप तयार करणे विषाणूलाही फारसे सोपे नाही. परंतु जर आपण सर्व रेस्टॉरंट्स, शाळा, सार्वजनिक वाहतूक आदी सुरू करून विषाणूला आव्हानच दिले आणि मास्क वापरणे बंद केले तर नवीन उत्परिवर्तन करण्याचा प्रयत्न विषाणू नक्की करेल.

जेव्हा एका मोठय़ा लोकसंख्येला संसर्ग होतो, तेव्हाच उत्परिवर्तनाचा धोका अधिक असतो. कधी कधी काही व्हेरिएन्ट एखाद्या विशिष्ट विभागापुरतीच मर्यादित राहतात आणि तेथील अगदी मर्यादित लोकांनाच त्या व्हेरिएन्टचा संसर्ग होतो. जेव्हा एखादा व्हेरिएन्ट मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्येला संसर्गग्रस्त करू शकत नाही, तेव्हा तो कालांतराने संपून जातो. संसर्गग्रस्त लोकांचे व्यवस्थित आयसोलेशन करण्यात आले, तर नवा म्युटंट धोकादायक असूनसुद्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आयसोलेट केलेल्या लोकांपुरताच त्याचा ‘अवतार’ मर्यादित राहील. अशा प्रकारे आपणच विषाणूवर हल्ला करणे आवश्यक असते.

चाचण्या आणि विलगीकरण (आयसोलेशन) ही विषाणूविरुद्धची मोठी दोन शस्त्र आहेत. ती व्यवस्थित वापरली तर आपण विषाणूचे योग्य व्यवस्थापन करू शकू. आता आपल्याला विषाणूबाबतची अधिक माहिती आहे आणि सुविधाही आपल्याकडे चांगल्या आहेत. त्यामुळेच दुसऱया लाटेसारखी मोठी आपत्ती पुन्हा येण्याची चिन्हे फारशी दिसत नाहीत, परंतु नागरिकांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. थोडीही हयगय करून चालणार नाही. तिसरी लाट मोठी आल्यास आरोग्यविषयक समस्यांबरोबरच आर्थिक नुकसानही खूप मोठय़ा प्रमाणावर होईल. नोकरी-व्यवसाय गमावल्यामुळे गरीबांना आधीच खूप त्रास सहन करावा लागत आहे. यापेक्षा अधिक त्रास सहन करण्याची त्यांच्याकडे ताकद तरी आहे का? म्हणूनच विषाणूच्या धोक्याविषयी नागरिकांनी जागरूक असलेच पाहिजे.

(लेखक हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलिक्युलर बायोलॉजीचे संचालक आहेत.)

[email protected]