
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईसह राज्यातील नशेबाजांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठा धक्का दिला आहे. गांजाचा दम मारणाऱ्या नशेबाजांसाठी हैदराबादहून तब्बल 180 किलो गांजाचा साठा मुंबईत आणण्यात आला होता. पण तो गांजा नशेबाजांपर्यंत पोहचण्याआधीच पोलिसांनी मानुखर्द येथे उचलला. शिवाय इतक्या मोठय़ा प्रमाणात गांजा घेऊन आलेल्या तेलंगणातील बडय़ा ड्रग्ज माफियाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शीव-पनवेल मार्गावरून तेलंगनातला एक बडा ड्रग्ज माफिया स्वतः गांजाच्या मोठय़ा साठय़ाची डिलेव्हरी घेऊन मानखुर्द येथे येणार असल्याची खबर घाटकोपर युनीटला मिळाली. त्यानुसार उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शशांक शेळके, उपनिरीक्षक खंडेराव बोबडे व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून गंगम रेड्डी या बडय़ा ड्रग्ज माफियासह त्याचा साथीदार अकुला व्यंकटेश्वरलु या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना कारमधून तब्बल 180 किलो गांजाचा साठा मुंबई व आजुबाजूच्या शहरात विकण्यासाठी आणला होता. तो सर्व साठा जप्त करून गंगम आणि अकुला यांना अटक केली. या धडक कारवाईमुळे मुंबई व आजुबाजूच्या शहरातील दम मारणाऱयांची मोठी पंचाईत झाली आहे.
पहिल्यांदाच बाहेर पडला अन्…
गंगम हा विशाखापट्टणम येथून गांजाचा साठा घेऊन यायचा. मग ज्याला गांजा पाहिजे त्याला तो हैदराबाद येथे डिलेव्हरी घ्यायला बोलवायचा. गांजाची डिलेव्हरी देण्यास हैदराबाद बाहेर जायचे तो नेहमी टाळायचा. यावेळी तो पहिल्यांदाच स्वतः मुंबईत गांजाचा साठा घेऊन आला आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सापळ्यात अडकला. या कारवाईमुळे स्थानिक पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.

























































