
देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढ होत आहे. हिंदुस्थानात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 220.66 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी कोरोना लसींबाबत मोठे विधान केले आहे. सिरमकडे कोरोनाच्या 50 ते 60 लाख लसींचे डोस पडून आहेत, परंतु रुग्णालयाकडून कोरोना लसींची मागणी होत नसल्याचे ते म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली. पुढे ते म्हणाले, केंद्राची सध्या कोरोना लसीची मागणी नाही, मात्र आम्ही 6 मिलियन लसींचा अतिरिक्त साठा तयार करून ठेवला आहे. यूएस आणि युरोपमध्ये आपल्याकडील एकाच लसीला मान्यता आहे, परंतु तिचीही मागणी सध्या खूप कमी आहे. लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोवोवॅक्स लस तयार आहे. तसेच सध्या कोरोनाचा धोका तितका गंभीर नाही. लोकांमध्ये दिसत असेलली कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी म्हणून बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

























































