
एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता देखणी ई-शिवनेरी बस दाखल होणार आहे. केवळ दोन तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी तब्बल 300 किलोमीटर धावणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ गाडय़ा मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावर धावत असलेल्या डिझेलवरील शिवनेरी गाडय़ा कमी केल्या जाणार आहेत.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 13 हजारहून अधिक गाडय़ा धावतात. मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱया शिवनेरीला तर प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने याच मार्गावर विजेवर धावणारी इलेक्ट्रिक शिवनेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने ओलेक्ट्रा या खासगी कंपनीकडून शंभर ई-शिवनेरी गाडय़ा घेण्याबाबत करार केला आहे. त्यापैकी आठ गाडय़ा आल्या असून त्या पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे आठवडाभरात या गाडय़ा मुंबई-पुणेदरम्यान धावताना दिसणार आहेत. दरम्यान, सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात केवळ दोन शिवाई इलेक्ट्रिक गाडय़ा असून त्या पुणे-नगर मार्गावर चालवल्या जात आहेत.





























































