
सामना ऑनलाईन, अमरावती
एका महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमरावतीमध्ये आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थी प्रश्न विचारत असताना त्यांचं मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांनी आदेश देतान पोलिसांनी कर्तबगारी दाखवत ताबडतोब या विद्यार्थ्याला पकडले.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची नोंद घेत या प्रकाराबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की “राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले. का ? कारण तो विद्यार्थी व्हिडीओ शूटींग करीत होता. त्यांना तरूण हे मतकेंद्रांची चौकीदारी करण्यासाठी हवे असून तरूणांच्या शिक्षण आणि रोजगाराबाबत त्यांना उत्तरं द्यायची नाहीये.”
Every student must read this. “The education minister of Maharashtra directs cops to arrest student”. Why? Because he was shooting an interaction! No tough questions please!
They want Youth only to man their electoral booths, not answer questions about education & jobs. pic.twitter.com/X7iv7XZzLs— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 5, 2019
शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजी आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेला उपस्थिती लावली होती. कार्यक्रम संपवून निघालेल्या तावडे यांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीमध्ये गाठले. विद्यार्थ्यांना काही प्रश्न होते ज्यांची उत्तरं त्यांना शिक्षणमंत्र्यांकडून हवी होती. या प्रश्नोत्तराचे एक विद्यार्थी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होता. तावडे यांच्या खासगी सहाय्यकाने त्या विद्यार्थ्याला हटकले आणि शूटींग थांबव असे सांगितले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. यानंतर शिक्षणमंत्री संतापले आणि त्यांनी पोलिसांना चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या विद्यार्थ्याला अटक केली आणि काही काळानंतर सोडून दिलं, मात्र त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
























































