मी मजबूत आहे, ईडीला घाबरणार नाही! एकनाथ खडसे यांचे भाजपला खडे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘तुम्ही कितीही छळ करा. कितीही बदनामी करा. मी मजबूत आहे, ईडीला घाबरणार नाही!’’ अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

जळगाव येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या वेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली. माझ्या पाठीमागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावल्याचे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे. मी त्यांचा आभारी आहे. मला कितीही त्रास द्या, माझी कितीही बदनामी करा. पण माझ्या जावयाला त्रास द्यायला नको होता, अशा शब्दांत खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. माझे जावई हे 20 वर्षांपासून ब्रिटनमध्ये नोकरी करत आहेत. राजकारणाशी त्यांचा संबंध नाही. पण चौकशीच्या नावाखाली त्यांना विनाकारण छळण्यात येत आहे. महाराष्ट्राची जनता सर्व पाहते आहे. जनता यांना कधीही माफ करणार नाही, योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देईल, असे एकनाथ खडसे म्हणाले. आतापर्यंत चारदा चौकशी झाली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही चौकशांचे फार्स चालूच आहेत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘रुक जाना नही, तू कही हारके, काटों पे चलके मिलेंगे रस्ते बहार के’ हा शेरही म्हणून दाखवला.