ट्रकच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना प्रभादेवी जंक्शन येथे घडली. अपघात करून चालक पळत होता. मात्र वाहतूक अंमलदाराने पाठलाग करून त्याला पकडले.

जुनी प्रभादेवी येथे राहणाऱ्या शारदादेवी ठाकूर (76) या प्रभादेवी जंक्शनजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांना वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली आणि चालकाने पळ काढला. त्याचवेळी तेथून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक पोलिसाने अपघात पाहिला. अपघात करून ट्रक निघून गेला पण पुढे जाऊन सिग्नल लागल्याने ट्रकला थांबावे लागले. हीच संधी साधत पोलिसाने ट्रक चालकाला पकडले. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या शारदादेवी यांचा मृत्यू झाला.

मृत्यू प्रमाणपत्रासाठी 500 रुपये घेणारा कारकून निलंबित

पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृत्यू प्रमाणपत्रासाठी बेकायदेशीररीत्या 500 रुपये घेणाऱ्या कारकुनाला पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीने ट्वीट केल्यानंतर पालिकेने बोरिवली येथील बाभई नाका स्मशानभूमीतील नोंदणी कारकुनाला निलंबित करून चौकशी सुरू केली आहे. संतोष तांबे असे या कारकुनाचे नाव आहे.
पालिकेच्या नियमानुसार मृत्यू प्रमाणपत्र हे पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये दिले जाते. त्यासाठी केवळ 6 रुपये इतके शुल्क आकारले जाते. मात्र,काही स्मशानभूमींमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे उकळले जातात. बोरिवली येथील बाभई नाका स्मशानभूमीत असा प्रकार पुढे आला आहे.