
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तेलंगाणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची आज निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली. मध्य प्रदेश, तेलंगाणा, मिझोराम आणि राजस्थानमध्ये एका टप्प्यात तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या पाचही राज्यांत 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान होणार असून 13 ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
3 डिसेंबरला निकाल
या पाचही विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकीत एकूण 16.14 कोटी मतदार आहेत. यात 8.2 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला मतदार आहेत. या निवडणुकीत 60.2 लाख नवीन मतदार (फर्स्ट वोटर्स) आहेत.
मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला राजस्थानात व 30 नोव्हेंबरला तेलंगणात मतदान होईल.
- मिझोराम-7 नोव्हेंबर
- छत्तीसगड -7 नोव्हेंबर , 17 नोव्हेंबर
- मध्य प्रदेश- 17 नोव्हेंबर
- राजस्थान-23 नोव्हेंबर
- तेलंगणा – 30 नोव्हेंबर
भाजपसाठी परीक्षा; ‘इंडिया’ला मोठी संधी
ही विधानसभा निवडणूक म्हणजे 2024च्या लोकसभेची रंगीत तालीमच ठरणार आहे. 2018चा अनुभव पाहता या पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळाली नव्हती. आमदार फोडाफोडी करून केवळ मध्यप्रदेशात बळजबरीने कमळ फुलवले होते. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठी संधी आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पुन्हा काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा कौल जनता देईल अशी शक्यता आहे. तेलंगणातही काँग्रेस आणि सत्ताधारी बीआरएसमध्ये जोरदार लढत होण्याचा अंदाज आहे.
पाच राज्यांत कोणाचे सरकार
पाच राज्यांत एकूण 679 विधानसभेच्या जागा आहेत. मध्य प्रदेशात सध्या भाजपचे सरकार आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेलंगाणात के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे सरकार आहे. तर मिझोराममध्ये जोरमथंगा यांच्या मिझो नॅशनल फ्रंट यांचे सरकार आहे.
























































