हिंदुस्थानी स्टार फ्लॉप : इंग्लंडची वनडे मालिकेत बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे लढतीत तुफानी खेळ करणारे टीम इंडियाचे स्टार शनिवारी लॉर्ड्स मैदानावर मात्र फ्लॉप ठरले. लॉर्ड्सवरील दुसरी एक दिवसीय लढत ८६ धावांनी जिंकत इंग्लंडने वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यजमानांचा नाबाद शतकवीर जो रूट संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विजयासाठीचे ३२३ धावांचे आव्हान पाहुण्या हिंदुस्थानाला पेलवले नाही . त्यांचा डाव ५० षटकांत २३६ धावांतच आटोपला.

यजमान इंग्लंड संघाला शनिवारी शतकवीर जो रूट पावला आणि त्यांनी दुसऱ्या वनडे लढतीत ५० षटकांत ७ बाद ३२२ अशी दमदार मजल मारली. इंग्लंडने पाहुण्या टीम इंडियापुढे विजयासाठी ३२३ धावांचे जबर आव्हान ठेवत मालिकेत पुनरागमनाचे संकेत दिले. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार इयान मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवत जेसन रॉय (४०) ,जॉनी बेयरस्टो (३८) यांच्या ६९ धावांच्या भागीदारीनंतर जो रूटने इंग्लंडच्या डावाची सूत्रे स्वीकारत संघाचा डाव सावरला. रूटने ११६ चेंडूंत नाबाद ११३ धावांची शतकी खेळी रचत इंग्लंडला ५० षटकांत ७ बाद ३२२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

हिंदुस्थानी संघ ३२३ धावांचा पाठलाग करताना ५० षटकांत सर्वबाद २३६ एवढीच मजल मारू शकला. हिंदुस्थानच्या वतीने शिखर धवन (३६ ), कर्णधार विराट कोहली ( ४५), सुरेश रैना (४६) आणि महेंद्रसिग धोनी (३७) यांनीच काहीसा प्रतिकार केला. पण त्यांचा खेळ संघाचा पराभव टाळू शकला नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लिअम प्लंकेटने ४६ धावांत ४ तर डेविड वहिली आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २-२ फलंदाज बाद करीत पाहुण्यांना पराभवाच्या खाईत लोटले.

धोनीच्या ३२० लढतींत १० हजार धावा

हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ३७ धावांची खेळी करताना ३२० लढतींत १० हजार ४ धावांचा पल्ला गाठला. १० हजारी क्लबमध्ये स्थान मिळवणारा धोनी हा हिंदुस्थानचा चौथा आणि जगातला १२ वा फलंदाज ठरला आहे.