
जगात असे पुष्कळ लोक असतात, ज्यांना दोन गोष्टी हटकून आवडतात. एक खाणे आणि दुसरी झोपा काढणे. बाकी आवडी कितीही वेगळ्या असल्या तरी या दोन गोष्टी आवडत नाहीत, असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
यातले जे लोक खाण्याचे शौकिन असतात, ते लोक वेगवेगळ्या प्रकारचं मसालेदार, तळलेलं अन्न, फास्ट फूड इत्यादी पदार्थ अवश्य खातात. मात्र असे पदार्थ वारंवार आणि जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजनकाट्यावर भार पडू लागतो. कारण, अशा अन्नपदार्थात उष्मांक (कॅलरीज) अधिक प्रमाणात असतात. तर यातल्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांना भरपूर झोप घ्यायला आवडते.
पण, तुम्हाला माहिती आहे का की झोप आणि भुकेचा फार घट्ट संबंध असतो. एका संशोधनानुसार जे लोक जास्त प्रमाणात झोपतात, त्यांचं वजन वाढत नाही. कदाचित या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आपली झोप आणि भुकेचा फार गहिरा संबंध असतो. शिकागो विद्यापीठातील एका संशोधनानुसार, जे लोक जास्त झोपतात, त्यांचं वजन नियंत्रणात राहतं.
या संशोधनानुसार, दररोज रात्री घेतलेली एका तासाची अधिक झोप तुमचं वजन वर्षाकाठी तीन किलोंनी कमी करू शकतं. या संशोधनात 21 ते 40 वयोगटातील 80 जणांच्या झोपेचं वेळापत्रक तपासण्यात आलं. हे लोक रोज साडे-सहातासाहून कमी झोप घेत होते. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून आधी त्यांच्या झोपेचा पॅटर्न समजून घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या लघवीतून त्यांच्या आहारातील कॅलरीजचं प्रमाण तपासलं गेलं.
त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, जे लोक रोज एक ते दीड तास अधिक झोप घेतात, त्यांच्या शरीरात सरासरी 270 कॅलरीज कमी जातात. त्यामुळे असे लोक एका वर्षात चार किलो वजन कमी करू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
वास्तविक, सर्वसाधारण डाएट कंट्रोल प्लानमध्येही पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण, सध्या लठ्ठपणा ही समस्या अधिक अन्नसेवन आणि व्यायामाच्या अभावाने भेडसावत आहे. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांची भूक वाढते आणि त्यामुळे वजन वाढत राहतं. पुरेशा प्रमाणात घेतलेली झोप तुमच्या शरीराची अधिक कॅलरीजची गरज नष्ट करते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं, हे संशोधनातून यापूर्वीही सिद्ध झालं आहे.




























































