भाग्यश्रीच्या वाट्याला आलेली सुपरहिट भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळणार होती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेदिग्दर्शक सुरज बडजात्या यांचा 1989च्या काळातील सुपरहिट सिनेमा ‘मैने प्यार किया’ आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमामुळे अभिनेता सलमान खान आणि भाग्यश्री दोघंही रातोरात स्टार बनले. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्रीऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री नादिया मोईडू हिची वर्णी लागणार होती. नुकतेच तिने वंडर वूमनच्या प्रमोशन दरम्यान पिंकविल्ला दिलेल्या मुलाखतीत हा सिनेमा का नाकारल्याचे कारण सांगितले आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत नादिया सांगते की, खरंतर यामागे मोठी कथा आहे. पण मी त्याबाबत थोडक्यात सांगते. मला त्यावेळी या सिनेमाची ऑफर आली होती. मात्र माझं त्यादरम्यान लग्न ठरल्याने मी हा सिनेमा करु शकले नाही. त्यावेळी राजश्री प्रोडक्शन माझ्याकडे या सिनेमाची ऑफर घेऊन आले होते आणि त्यांना काही ठराविक तारखा शुट करण्यासाठी हव्या होत्या. पण त्यावेळी आधीच लग्नाची तारीख, जागा सगळं काही ठरलं असल्याने हा सिनेमा नाकारण्यामागे प्रमुख कारण असल्याचे तिने सांगितले.

नादिया सध्या तिचा आगामी सिनेमा ‘वंडर वूमन’चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सिनेमाला अंजली मेनन यांचे दिग्दर्शन आहे. अंजली मेनन यांनी याआधी मल्याळमध्ये रोमॅण्टिक कॉमेडी ड्रामा ‘बॅंगलोर डेज’ केला असून याचबरोबर अनेक सिनेमा केले आहेत. अंजली मेनन दिग्दर्शित ‘वंडर वूमन’ या सिनेमात नादिया मोईडू, नित्या मेनन, पार्वती तिरुवेथू, पद्मप्रिया, सायनोरा फिलीप, अर्चना पद्मिनी आणि अमृता सुभाष आदी कलाकार आहेत.