
सामना प्रतिनिधी । नांदेड
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून ते उचित नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. सुजय पाटील यांचा भाजप प्रवेश ही दुर्दैवी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, सुजय पाटील यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. ही दुर्देवी बाब आहे. मुख्यमंत्र्यांची साम, दाम, दंड, भेद ही निती लोकशाहीला मारक आहे. इतर पक्षातील लोक फोडायचे हे उचीत नसल्याचे स्पष्ट करुन भाजपाच्या या कृतीचा आपण निषेध करीत असल्याचे चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या अन्य मित्र पक्षांची परिस्थिती चांगली असून, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत खुलेच राहतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाना पटोले यांना उमेदवारी देऊ नये याबद्दलचे अनेक मेल पक्षाचे नेते राहुल गांधींना नागपूरमधून दलित संघटनांनी पाठविले आहेत. या विषयी आपण माहिती घेवून योग्य तो निर्णय घेवू, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केली.
अझर मसूदच्या संदर्भात पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी जो उल्लेख केला आहे, त्याबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले की, अतिरेक्यांच्या संदर्भात राहूल गांधींच्या मनात वेगळी भावना असण्याचे कारण नाही. दहशतवादाच्या विरोधात आम्ही लढा देत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

























































