भारतीय जनता पक्षाला (भाजप) उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला असून, अनेक महत्त्वाच्या जागांवर ते निवडणूक हरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यात अयोध्या ज्या मतदार संघात येते त्या फैजाबादच्या जागेचाही समावेश आहे. अयोध्या शहर फैजाबाद शहरातच येते, जिथे भगवान श्रीरामाचं भव्य मंदिर बांधल्यानंतर ही जागा भाजपसाठी खूप सहज आणि सोपी जाईल असं मानलं जात होतं, परंतु आजच्या निकालात ही भाजपचा या जागेवर मोठा पराभव होणार असं पाहायला मिळत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा-आरएलडीची आघाडी होती आणि काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली. मात्र, युती होऊनही सपा-बसपाला फारशा जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांच्या आघाडीला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या, तर एकट्या भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. तर अपना दल (एस)ला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
यंदा मात्र मतमोजणीचा कल पाहता संपूर्ण चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. समाजवादी पक्षानं 37 जागांवर आघाडी घेतली आहे, तर सोबत असलेल्या काँग्रेसनं देखील 6 जागांवर चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय लोकदल अवघ्या दोन जागांवर पुढे आहे.
समाजवादी पक्षाचे (सपा) अवधेश प्रसाद 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी भाजप उमेदवार लल्लू सिंह यांना अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीवर टाकलं आहे. निवडणूक आयोगाच्या 554289
यावेळी अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या जागेवर नवा प्रयोग केला आणि ती सर्वसाधारण जागा असूनही अयोध्येतील सर्वात जास्त दलित लोकसंख्या असलेल्या पासी समाजातून अखिलेश यादव यांनी आपला मजबूत पासी चेहरा उमेदवार म्हणून उभा केला. अवधेश पासी हे सहा वेळा आमदार, मंत्री आणि समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक राहिले आहेत. पासी समाज ही संख्येच्या दृष्टीने अयोध्येतील सर्वात मोठा समाज मानला जातो.
भाजपने तिसऱ्यांदा लल्लू सिंह यांना संधी दिली, ते सलग दोन वेळा खासदार राहिले आहेत. हे तेच लल्लू सिंह आहेत ज्यांनी संविधान बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. खुद्द लल्लू सिंह म्हणाले होते की, मोदी सरकारला 400 जागांची गरज आहे कारण संविधान बदलावे लागेल.
फैजाबादमध्ये सपाच्या दलित चेहऱ्यामुळे ‘ना मथुरा ना काशी अयोध्येत, फक्त अवधेश पासी’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. दलित उमेदवाराच्या मागे फक्त दलित समाजच नाही तर कुर्मी सारख्या ओबीसी समाजांनीही मोर्चेबांधणी केल्याचे मानले जाते. राममंदिर बांधूनही अखिलेश यांनी फैजाबादमध्ये असा बुद्धिबळाचा खेळ खेळला की, त्यांनी येथे भाजपला मागे सोडले.
फैजाबादमधून तिन्ही पक्ष विजयी झाले आहेत
हिंदुत्वाच्या राजकारणाचे केंद्र असूनही हे शहर भाजपचा बालेकिल्ला राहिलेले नाही. विविध पक्षांच्या नेत्यांनी येथून निवडणुका जिंकल्या आहेत. 1991 पासून येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाजपचे वर्चस्व आहे, परंतु फैजाबाद लोकसभा जागेवर उत्तर प्रदेशातील तीनही मोठ्या पक्ष, भाजप, सपा आणि काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणुकीत विजय नोंदवला आहे.